Join us

अमेरिकन डॉलर होऊ लागलाय दुबळा, जागतिक देवाण-घेवाणीत युआनची हिस्सा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 4:21 AM

अनेक देशांचा स्थानिक चलनातही व्यापार वाढला

लंडन : आंतरराष्ट्रीय चलन विनिमय व्यवहारांत अमेरिकी डॉलरच्या अनभिषिक्त साम्राज्यास अन्य प्रमुख चलनांकडून आता आव्हान मिळू लागले आहे. अमेरिकेची धोरणेच यास कारणीभूत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनसोबतचे द्वंद्व, युक्रेन युद्धाचे झटके आणि अमेरिकेतील कर्ज संकट यामुळे डॉलरच्या स्थितीवर परिणाम होत आहे. भारतासह अनेक देशांचा स्थानिक चलनात परस्पर आपसी व्यापार वाढू लागला आहे. रशियावर निर्बंध लावल्यानंतरही अनेक देश रशियाचे चलन रुबलमध्ये परस्पर व्यापार करीत आहेत. याशिवाय संयुक्त अरबच्या दिरहममध्येही व्यापार वाढला आहे. 

माेठ्या अर्थव्यवस्था पर्यायाच्या शाेधातरशिया, चीन, भारत आणि संयुक्त अरब आमिरात यासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था जागतिक व्यापारासाठी डॉलरला पर्याय शोधत आहेत. बांगलादेशसारखे डझनभर छोटे देशही स्थानिक चलनात परस्पर व्यापार करीत आहेत. जाणकारांनी सांगितले की, युक्रेन युद्धानंतर रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारताकडून यूएईचा दिरहम आणि रुबलचा वापर केला जात आहे.

८८ अब्ज डॉलरचे तेल, कोळसा आणि धातू चीनने युआनद्वारे रशियाकडून खरेदी केले आहे. जागतिक व्यापारातील युआनची हिस्सेदारी आता वाढून ७% झाली आहे.

विदेशी चलनात डॉलरचा हिस्सा घसरलाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या चौथ्या तिमाहीत जगभरातील केंद्रीय बँकांच्या विदेशी चलन साठ्यातील डॉलरचा हिस्सा घसरून ५८ टक्के झाला. हा २० वर्षांचा नीचांक आहे. आता तो आणखी घटून १९९५ च्या पातळीवर आला आहे. 

का शोधला जात आहे पर्याय? यूरिझोन एसएलजे कॅपिटलचे सीईओ स्टीफन जेन यांनी सांगितले की, यूक्रेनवरील हल्ल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया, भारत, चीन आणि तुर्कस्तान यासारख्या देशांना डॉलरऐवजी दुसऱ्या चलनांचा वापर करणे भाग पडत आहे.

डॉलरला बाजूला सारणे सोपे नाहीबर्कलेमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक बॅरी आयचेन्ग्रिन यांनी सांगितले की, बँका, कंपन्या आणि सरकारे यांच्यासाठी डॉलर बाजूला सारून व्यवसाय करणे सोपे नाही. जागतिक चलन विनिमयात डॉलरची हिस्सेदारी ९० टक्के आहे.

टॅग्स :पैसाअमेरिकाचीन