Vodafone Idea 5G Services: भारतीय टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडने (Vodafone Idea Limited, Vi) ५जी रोलआउट स्ट्रॅटेजीला मंजुरी दिली असून युजर्सना आनंदाची बातमी मिळाली आहे. ५जी नेटवर्कसाठी बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी कंपनी पुढील महिन्यात मार्च २०२५ मध्ये मुंबईत आपल्या ५जी नेटवर्कची व्यावसायिक लाँचिंग सुरू करणार आहे. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये दिल्ली, बेंगळुरू, चंदीगड आणि पाटणा येथेही व्हीआयची ५जी सेवा उपलब्ध होईल.
व्हीआय केवळ ५जी वर लक्ष केंद्रित करत नाही तर ४जी नेटवर्क चा विस्तार करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या नऊ महिन्यांत कंपनीनं ४जी कव्हरेजसह आपल्या नेटवर्कमध्ये सुमारे ४.१ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. कंपनीनं चांगल्या इनडोअर कव्हरेज आणि जलद गतीसाठी १५,००० साइट्सवर ९०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये ४जी टॉवर बसवले आहेत, तर १८०० मेगाहर्ट्झ आणि २१०० मेगाहर्ट्ज बँडवर १०,४०० नवीन साइट्स देखील जोडल्या आहेत.
नफ्याचं आव्हान अजूनही कायम
व्हीआयला १.७ टक्के महसुली वृद्धी मिळाली असली तरी कंपनीवरील आर्थिक संकट अजूनही कायम आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल १११.२ अब्ज रुपये नोंदविण्यात आला होता, परंतु या दरम्यान कंपनीला ६६.१ अब्ज रुपयांचा निव्वळ तोटा झालाय. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीनं आपलं बँक कर्ज ५२.९ अब्ज रुपयांनी कमी करून २३.३ अब्ज रुपयांवर आणलंय.
भारतात व्हीआयला एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल सारख्या टेलिकॉम कंपन्यांकडून कडवी स्पर्धा सहन करावी लागत आहे, ज्यामुळे त्यांचा सब्सक्राइबर बेस सातत्यानं कमी होतोय. दुसऱ्या तिमाहीतील २०५ मिलियन ग्राहकांवरून तिसऱ्या तिमाहीत हा आकडा १९९.८ मिलियनवर आला. मात्र, कंपनीच्या पोस्टपेड सेगमेंटमध्ये २५.२ दशलक्ष नवे युजर्स जोडले गेलेत.