Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 06:09 IST

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील ग्राहक आयोगाने नुकसानभरपाईचे आदेश दिले. 

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कविशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : वेदिक्स कस्टमाइज्ड आयुर्वेदिक कंपनीची उत्पादने वापरल्यानंतर टक्कल पडले म्हणून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी जबाबदार धरत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील ग्राहक आयोगाने नुकसानभरपाईचे आदेश दिले. 

पी.एम. श्रावंथी यांनी  सोशल मीडियावर  वेदिक्स कस्टमाइज्ड आयुर्वेदिक (वेदिक्स)ची जाहिरात पाहिली. वेदिक्सचा दावा होता की, त्यांची आयुर्वेदिक उत्पादने केसांची गळती कमी आणि  लांबी वाढवू शकतात.  श्रावंथी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ‘वेदिक्स’च्या प्रतिनिधींनी वेदिक्स केस उत्पादनांचे  फायदे सांगितले. अपेक्षा पूर्ण न झाल्यास परताव्याचे  आश्वासनही दिले.

तिने केसांचे तेल, सीरम आणि शॅम्पूची  ऑर्डर दिली. हे सर्व वापरल्यानंतरही तिचे केस गळणे थांबले नाही.  तिने ‘वेदिक्स’ला ई-मेल आणि फोन कॉलद्वारे हे सांगितले. आणखी काही महिने उत्पादने वापरणे सुरू ठेवण्याच्या त्यांच्या सल्ल्याचे पालन करूनही कोणतीही सुधारणा झाली नाही. जेव्हा तिने परतावा मागितला तेव्हा ‘वेदिक्स’ने थोडासा परतावा देऊ केला. 

मानसिक त्रासापेटी ४० हजार देण्याचे निर्देश दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अवलंबून राहून हेअर प्रॉडक्ट्स निवडले. हेतुपुरस्सर केलेल्या या फसवणुकीमुळे त्यांची दिशाभूल झाली आणि त्यांनी उत्पादनांच्या वापराचे प्रतिकूल परिणाम अनुभवले, असे मत आयोगाने व्यक्त केले.‘वेदिक्स’ने ग्राहकांच्या विश्वासाचा भंग तसेच ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले म्हणत आयोगाने तक्रारदाराला ४० हजार आणि खटल्याच्या खर्चासाठी ५ हजार देण्याचे आदेश दिले.

असा मिळाला न्याय...५० टक्के केस गमावल्यानंतर तिने ‘वेदिक्स’ला नोटीस बजावत  नुकसानभरपाई मागितली. तिच्या नोटिसांना उत्तर न मिळाल्याने तिने ग्राहक विवाद निवारण आयोगात तक्रार दाखल केली. वेदिक्स  आयोगासमोर हजर झाला नाही म्हणून यात एकतर्फी निर्णय देण्यात आला.

टॅग्स :धोकेबाजीग्राहक