टाेक्याे : नाेकरी म्हटले की, आठवड्यात ५ किंवा ६ दिवस काम, तेदेखील दिवसातील काही तास. त्यानंतर महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांत पगार खात्यात जमा. जगभरात कामाच्या माेबदल्यात पैसे, हाच फंडा आहे. मात्र, एक व्यक्ती चक्क काम न करण्यासाठी पगार घेताे. काहीही न करण्याचा व्यवसाय करताे. खाेटे वाटेल, पण जपानमध्ये अशी एक व्यक्ती आहे.
टाेक्याेमध्ये राहणारा शाेजी मारिमाताे असे या व्यक्तीचे नाव आहे. ताे दिवसाला १५ ते २० हजार रुपये काहीही न करण्याचा पगार घेताे. ठरावीक कालावधीत किती काम केले, याचा अधूनमधून रिपाेर्टही मागितला जाताे. कामाचा आढावा घेऊन वार्षिक पगारवाढदेखील हाेते. मात्र, जपानमधील या व्यक्तीला पगार मिळविण्यासाठी काहीही करावे लागत नाही. ‘काहीही न करणे’ हेच त्याने करिअर मानले.
नाेकरी साेडून त्याने स्वत:ला भाड्याने देणे सुरू केले. एकटेपणामुळे त्रस्त असलेल्या लाेकांना ताे वेळ देऊ लागला. अशा लाेकांसाेबत कुठे जाणे, बसणे किंवा भाेजन करणे, हेच त्याचे काम. बरं त्याला काही बाेलावे पण लागत नाही. एकाने रेल्वेस्थानकावर फक्त ‘टाटा’ करण्यासाठी शाेजीला बुक केले हाेते. (वृत्तसंस्था)
बाॅसचे एक वाक्य आणि बदलले करिअर
मारिमाताे हा सुरुवातीला मन लावून काम करायचा. मात्र, त्याला राेजच्या दिनचर्येचा कंटाळा आला. त्याला रिकामे बसणे आवडायला लागले. एक दिवस साहेबांनी त्याला म्हटले, तू काहीच कामाचा नाही. ही गाेष्ट त्याला खटकली आणि ‘काम न करणे’ हेच करिअर बनविण्याचे ठरविले.