नवी दिल्ली - गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल २५ ते ३० डॉलरनी स्वस्त झाले आहे. सध्या क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति-बॅरल दरावर ट्रेंड होत आहे. मात्र आपल्या देशात पेट्रोलडिझेलच्या किमतींमध्ये कुठलीही घट झालेली नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केलयानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे ९.५० आणि ७ रुपयांनी घट झाली होती.
सध्या ब्रेंट क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेंड करत आहे. तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार क्रूड ऑईलच्या किमती ह्या ८०.८५ डॉलरपर्यंत घसरू शकतात. या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.
माध्यमांतील वृत्तानुसार खनिज तेलाच्या किमतींमध्ये १ डॉलर प्रति बॅरलने वाढल्यास किंवा घटल्यास देशात तेल कंपन्यांना एक लिटरमागे ४५ पैशांचा परिणाम होतो. या हिशोबाने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११ ते १२ रुपयांची घट होऊ शकते. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल १११.३५ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलीटर दराने मिळते.