लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकार तीन पर्यायांवर विचार करीत आहे. कंपनीचे ४९ टक्के समभाग स्वत:कडे ठेवून, उरलेले भागभांडवल विकून टाकण्याचा एक पर्याय त्यात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, नीति आयोगाने एअर इंडिया संपूर्णत: (१00 टक्के) विकून टाकण्याची शिफारस केलेली आहे. या शिफारशीवरही विचार सुरू आहे. तिसरा पर्याय मारुतीच्या मॉडेलचा आहे. मारुतीमध्ये सरकारने बहुतांश नियंत्रण सुझुकीकडे दिले, त्या बदल्यात सरकारला मोबदला मिळाला.
त्यानंतर, सरकारने समभागांची सार्वजनिक विक्री करून आपली हिस्सेदारी आणखी कमी केली. भारतीय बँकांना आणि वित्तीय संस्थांना काही समभाग विकण्यात आले.
जगातील अनेक देशांतील सरकारांनी आपल्या मालकीच्या हवाई कंपन्यांतून बाहेर पडताना लोकांना समभाग विकले आहेत. नीति आयोगाच्या शिफारशीनंतर एअर इंडियाचा मुद्दा अलीकडे अधिक चर्चेत आला आहे. १00 टक्के समभाग विकून टाकावेत, तसेच कंपनीचे कर्ज बुडीत खात्यात जमा करावे, अशी शिफारस नीति आयोगाने केली आहे.
एअर इंडिया विकून टाकण्याच्या कल्पनेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावर त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री ए. गजपती राजू यांच्याशी चर्चाही केली आहे. अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळच घेईल. तथापि, तत्पूर्वी अनेक पर्याय तपासून पाहिले जात आहेत.
सूत्रांनी सांगितले की, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येण्यापूर्वी विमान वाहतूक मंत्रालयाला काही निर्णय घ्यावे लागतील. विदेशी कंपनीला बहुतांश हिस्सेदारी विकायची का, याचा निर्णय प्रामुख्याने मंत्रालयाला घ्यावा लागणार आहे. कतार एअरवेज एअर इंडियाच्या खरेदीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्यास तीन पर्यायांचा विचार
एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकार तीन पर्यायांवर विचार करीत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 04:28 AM2017-06-06T04:28:06+5:302017-06-06T04:28:06+5:30