कर्जांवरील व्याजदर गेल्या वर्षभरापासून रेकॉर्ड स्तरावर आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे. त्याचा परिणाण बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जांच्या व्याजदरावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. गुंतवणुकदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. मात्र त्यासोबतच कर्जावरील व्याजदरांमध्येही भरमसाट वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, व्याजदर सध्यातरी चढे राहणार आहेत. तसेच हे व्याजदर कधीपर्यंत चढ्या स्थितीत राहिल हे येणारा काळच सांगणार आहे.
सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रमुख केंद्रीय बँकांनी वाढत्या महागाई दराचा सामना करण्यासाठी प्रमुख धोरणात्मक दरांमध्ये वाढ केली आहे. मात्र महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही. सध्या रेपो रेट ६.५ टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. याआधी गतवर्षी मे महिन्यापासून एकूण सहावेळा मिळून रेपोरेटमध्ये २.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शक्तिकांत दास यांनी सांगितले की, व्याजदर हे सध्यातरी चढेच राहतील. ते कधीपर्यंत या स्थितीत राहतील, हे येणार काळच सांगेल. एमपीसीने सक्रियपणे महागाईला लगाम घातला पाहिजे. त्यांनी सांगितले की, असे झाल्यामुळेच जुलैमध्ये ७.४४ टक्क्यांच्या उच्चस्तरावरून चलन फुगवठ्याच्या दरात घसरण सुरू झाली. दास यांनी सांगितले की, पतधोरण हे नेहमीच आव्हानात्मक असतं आणि त्यामध्ये आत्मसंतुष्ट होण्यासारखी कुठली बाब नाही आहे.