एअर इंडिया पुन्हा टाटा ग्रुपकडे आली आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. जेआरडी टाटा यांनी सुरु केलेली एअरलाईन भारत सरकारने राष्ट्रीयीकरणावेळी आपल्या ताब्यात घेतली होती. आज एअर इंडियाकडे १२००० कर्मचारी, १४० हून अधिक विमाने आणि जगभरातील विमानतळांवर जागा उपलब्ध आहेत. टाटाला आता एअर इंडियावर लागलेला सरकारी, लेट लतिफ आणि वाईट सेवेचा शिक्का पुसायचा आहे. या साऱ्या घडामोडींनंतर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून टाटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
एअर इंडिया हा असा ब्रँड होता जो देशाची मौल्यवान संपत्ती होता. एअर इंडियाला जुनी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी माझ्या दृष्टीने Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही, टाटा आणि एअर इंडियाचे अभिनंदन अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एअर इंडियाचा इतिहास...
एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली स्थापन केलेल्या विमान कंपनीचे नाव टाटा एअर सर्व्हिसेस होते. या कंपनीला प्रथम टपाल वाहतुकीची परवानगी मिळाली होती. जेआरडी टाटा हे निष्णात वैमानिक होते. त्यांनी टपाल घेऊन १५ ऑक्टोबर १९३२ टाटा एअर सर्व्हिसच्या विमानाचे स्वत: पहिले उड्डाण कराची ते मुंबई या मार्गावर केले. १९३८मध्ये या कंपनीचे नाव टाटा एअरलाईन्स ठेवण्यात आले. त्यानंतर १९४६ मध्ये या कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
We at @MahindraRise congratulate the @TataCompanies & the whole @airindiain family on this milestone. Air India is a brand that’s part of the nation’s treasure trove. There is no better custodian, from the point of view of both passion & resources to restore its old glory. https://t.co/TEkCSwKeZZ
— anand mahindra (@anandmahindra) January 27, 2022
नवा अध्याय सुरु होतोय...
टाटा समुहानं आपल्या ट्वीटरवर एअर इंडियाचं स्वागत करत Excited to take off with you! असा संदेश लिहिला आहे. यासोबतच एक सुंदर फोटोही टाटा समुहानं रिट्वीट केलाय. 'टाटा समुहाच्या एका भागाच्या रुपात एअर इंडियासाठी आता नवा चॅप्टर सुरू होत आहे. प्रवास पुढे नेण्यासाठी आता दोन आयकॉनिक नावं एकत्र आली आहेत. आपल्या देशसेवेची मोहीम आणि आमचा बहुमूल्य वारसा सोबत काम करण्यासाठी उत्साहित आहेत. टाटा कंपनीचं स्वागत,' असं ट्वीट एअर इंडियानं केलंय.