नवी दिल्ली : भांडवली खर्चात भरीव वाढ करून आर्थिक विकासाला चालना देण्याबाबत अर्थसंकल्पात गवगाव करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात ज्या पद्धतीने निधीचे वाटप केले गेले आहे, ते अतिशय चुकीचे आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. नोकऱ्या वाढतील असे अर्थसंकल्पात काहीही नाही, असे माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटले आहे.
महागाई आटोक्यात आणण्यास मदत होईल, असे काहीही बजेटमध्ये नाही. किरकोळ महागाई अलीकडे थोडी कमी झाली आहे, ही वेगळी बाब आहे. पण ती अजूनही उच्च आहे आणि त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
बचतीची गरज नाही
ते म्हणाले, आता ७ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), एलआयसी प्रीमियम यांसारख्या बचतीची गरज भासणार नाही.
काय कठीण?
निर्गुंतवणुकीचे लक्ष्य कमी केल्याबाबत ते म्हणाले, मला वाटते की, सरकारने खासगीकरण कार्यक्रम सोडला आहे. कदाचित सरकारला बँका आणि इतर उद्योगांमधील हिस्सेदारी विकणे राजकीयदृष्ट्या कठीण जात आहे.