Join us

इंधनदर कपातीसंदर्भात सरकारकडून कोणतीही सूचना नाही, भारत पेट्रोलियमच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 2:23 AM

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंबंधी सरकारकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही.

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंबंधी सरकारकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्टÑीय किमतीनुसार हे दर कमी-अधिक होतच राहतील, असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या सरकारी तेल कंपनीचे अध्यक्ष डी.राजकुमार यांनी स्पष्ट केले.बीपीसीएलची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने पत्रकारपरिषद घेतली. कच्च्या तेलाचे दर वाढत राहील्यास कंपनी नुकसान सहन करुन देशांतर्गत इंधन दरवाढ थांबवणार का? या प्रश्नाच्या उत्तरात राजकुमार म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल नियंत्रणमुक्त केले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशांतर्गत दर निश्चित होत राहतील. हे दर कमी करणे किंवा वाढविणे, याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.बीपीसीएलच्या मुंबईतील चेंबूरजच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात अलिकडे मोठी आग लागली होती. या संदर्भात राजकुमार यांनी सांगितले की, मुंबईच्या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तेथील एलपीजी प्लान्ट पुढील दोन वर्षात इतरत्र हलविला जाणार आहे. त्यामुळे या शुद्धीकरण केंद्रातील टँकर्सची ये-जा ४३ टक्क्यांनी कमी होईल. एलपीजी प्लान्टसाठी कंपनीने जागेचा शोध सुरू केला आहे.>तेल कंपन्यांना घसघशीत नफाएप्रिल व मे महिन्यात इंधन दरात मोठी वाढ झाली होती, जूनमध्ये मात्रदर घटले होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) बीपीसीएलच्या नफ्यात मागीलवर्षीपेक्षा २०८ टक्के वाढ झाली. या तिमाहीत कंपनीला २२९३ कोटींचा नफा झाला. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (आयओसी) नफ्यातही या तिमाहीत ५० टक्के वाढ झाली. आयओसीलाही ७ हजार कोटींचा नफा झाला आहे.

टॅग्स :पेट्रोल