Join us

पैसे जमा करण्यासाठी यापुढे बँकेत जायचीच गरज नाही

By admin | Published: September 22, 2016 4:04 AM

एटीएमच्या धर्तीवर लवकरच एक नव्या प्रकारचे कॅश डिपॉझिट मशिन विकसित करीत असल्याने, बँकेत पैसे जमा करायला यापुढे कोणालाही प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनतर्फे एटीएमच्या धर्तीवर लवकरच एक नव्या प्रकारचे कॅश डिपॉझिट मशिन विकसित करीत असल्याने, बँकेत पैसे जमा करायला यापुढे कोणालाही प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. ज्याप्रमाणे एटीएम मशिनमधून आपण कोणत्याही बँकेतले पैसे काढू शकतो, त्याच धर्तीवर कोणत्याही बँकेचे पैसेही या मशिनमधे जमा करता येतील. त्यासाठी त्याच बँकेचे रोख भरणा मशिन असण्याची गरज नाही.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रायोगिक तत्वांवर सुरूवातीला इन्टर आॅपरेबल कॅश डिपॉझिट मशिनचा प्रयोग आंध्रा बँक, पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक व युनियन बँक आॅफ इंडिया अशा तीन बँकांच्या माध्यमातून सुरू केला जाणार आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास देशातल्या सर्वच बँकांमधे या प्रयोगाचा टप्प्याटप्प्याने प्रारंभ होईल.रोख रकमेच्या भरण्यासाठी सुरू होणाऱ्या कॅश डिपॉझिट मशिनची रचना एटीएम सारखीच असेल. या मशिनव्दारे कोणत्याही बँकेच्या खात्यात लगेच (रिअल टाईम) पैसे जमा करता येतील. कॅश डिपॉझिटसाठी काही बँकांनी यापूर्वी अशी काही मशिन्स कार्यान्वित केली होती मात्र त्यात ज्या बँकेत पैसे जमा करायचे आहेत, त्याच बँकेच्या मशिनमधे पैसे भरण्याची सोय उपलब्ध होती. कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे भरता येण्यासारख्या सुविधा त्यात नव्हत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)>खातेदाराला याचा सर्वात मोठा फायदा कॅश डिपॉझिट मशिनचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर, प्रत्येक बँकेला जागोजागी असे मशिन्स लावता येतील. खातेदाराला याचा सर्वात मोठा फायदा असा की बँकेत पैसे जमा करण्यासाठी त्याला संबंधित बँकेत जावे लागणार नाही. तसेच ज्या बँक खात्यात पैसे जमा करावयाचे आहेत, तो व्यवहारही त्वरित पूर्ण होउन त्या खात्यात लगेच पैसे जमा होतील. ज्या जागामालकांनी एटीएमसाठी यापूर्वी जागा भाड्याने दिल्या आहेत, त्यांना यापुढे या नव्या मशिनसाठीही जागा भाड्याने देता येतील. त्यांच्या उत्पन्नात त्यामुळे थोडी वाढ होऊ शकेल. सध्या शहरांमधे एका एटीएम मशिनच्या जागेचे भाडे दरमहा सरासरी १५ ते २0 हजार रूपये आहे.