>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - जिओची 'हॅपी न्यू ईअर' ऑफर कोणत्याही नियमाचं उल्लंघन करत नसल्याचं स्पष्टीकरण जिओने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (ट्राय) दिलं आहे. ट्रायच्या नियमानुसार प्रमोशनल ऑफर 90 दिवसांपेक्षा जास्त काळ दिली जाऊ शकत नाही. रिलायन्सची जिओ वेलकम ऑफर 4 डिसेंबर रोजी संपत आहे. मात्र रिलायन्सने 'हॅपी न्यू ईअर' ऑफरची घोषणा करत मोफत डाटा आणि कॉलची सुविधा 31 मार्चपर्यंत वाढवली आहे.
रिलायन्सकडून जिओच्या नवी ऑफरची घोषणा झाल्यानंतर ट्रायने जिओकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. जिओकडून विस्तारितपणे स्पष्टीकरण देण्यात आलं असून ही ऑफर लॉचिंगवेळी घोषणा करण्यात आलेल्या ऑफरपेक्षा वेगळी असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही ऑफर प्रमोशनल ऑफरचा विस्तार आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही असाही दावा जिओकडून करण्यात आला आहे.
ट्रायने 20 डिसेंबरला जिओला नोटीस पाठवली होती ज्यामध्ये 'हॅप्पी न्यू ईअर' ऑफरला नियमांचं उल्लंघन म्हणून का पाहू नये ? असं विचारण्यात आंल होतं. सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या जिओच्या वेलकम ऑफरमध्ये दिवसाला 4 जीबी डेटा फ्री दिला होता, जो नवीन ऑफरमध्ये 1 जीबीपर्यंत मिळणार आहे.