Join us  

तिकडे रुपया घसरताेय, इकडे बाजार; महागाईमुळे जनता त्रस्त

By प्रसाद गो.जोशी | Published: August 21, 2023 1:40 PM

सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात घसरण

प्रसाद गो. जोशी

जगभरात वाढत असलेला महागाईचा दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण याची चिंता बाजाराला लागली असल्याने सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजारात घसरण झाली. आगामी सप्ताहामध्ये अमेरिकेत जाहीर होणारी आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांच्या कामगिरीवर बाजाराची दिशा ठरणार आहे.

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहामध्ये ही घसरणच झाली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७३.९९ अंशांनी, तर निफ्टी १६४.२४ अंशांनी खाले आले. सेन्सेक्स ६५ हजारांच्याही खाली येत ६४,९४८.६६ अंशांवर, तर निफ्टी १९,३१०.१५ अंशांवर बंद झाला. मिडकॅपमध्ये १६४.२४ अंशांची घसरण होऊन तो ३०,२६५.३२ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये अत्यल्प अशी ७.२९ अंशांची घट झाली असून, तो अद्याप ३५ हजार अंशांच्यावर आहे.

सप्ताहात काय घडले?

  • चीनमधील उत्पादनामध्ये घट
  • महागाईच्या दरामध्ये वाढ
  • डॉलरसमाेर रुपयाची घसरगुंडी
  • वाढत्या व्याजदरामुळे चिंता
  • बॉण्डवरील व्याजामध्ये वाढ होत असल्यामुळे शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याकडे कल

परकीय वित्तसंस्था विक्रीच्याच मूडमध्ये

  • महिनाभरापासून भारतीय बाजारात सातत्याने विक्रीच करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहातही विक्री कायम ठेवली होती. 
  • सप्ताहभरामध्ये या संस्थांनी ३३७९.३१ कोटी रुपयांची विक्री केली. याच काळामध्ये देशांतर्गत वित्तसंस्थांनी यापेक्षा अधिक (३८९२.३ कोटी) खरेदी केली आहे. 
  • तरीही बाजारामध्ये घसरण झालीच. ऑगस्ट महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी १०,९२५.८४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ९२४५.८६ कोटी बाजारामध्ये गुंतविले आहेत.

महागाईमुळे जनता त्रस्त: या सप्ताहामध्ये अमेरिकेमधील बेरोजगारीची तसेच देशांतर्गत विक्रीची आकडेवारी जाहीर होईल. युरोपमधील पीएमआयही जाहीर होणार आहे. या आकडेवारीने बाजाराची दिशा ठरेल. त्याचप्रमाणे परकीय वित्तसंंस्था काय भूमिका घेतात, त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येईल. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार