Join us

गत आर्थिक वर्षात दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 9:06 AM

2,000 Rupees Notes: वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच करण्यात आला नाही, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे.

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच करण्यात आला नाही, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. २० रुपयांच्या नोटांचा पुरवठा मात्र वाढविण्यात आला आहे. २०१९-२० मध्ये २० रुपयांच्या १३,३९० लाख नव्या नोटा पुरविण्यात आल्या होत्या, तो आकडा २०२०-२१ मध्ये वाढवून ३८,२५०वर नेण्यात आला आहे.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, २०१८-१९ मध्ये दोन हजारांच्या ४६७ लाख नोटा पुरविण्यात आल्या होत्या. वित्त वर्ष २०२१ मध्ये एकूण नोटांचा पुरवठा ०.३ टक्क्यांनी कमी होऊन २,२३,३०१ लाख नोटा इतका राहिला. आदल्या वर्षात हा आकडा २,२३,८७५ इतका होता. वित्त वर्ष २०२१ मध्ये नोटांची मागणी (इंडेंट) आदल्या वर्षाच्या तुलनेत ९.७ टक्क्यांनी कमी राहिली. नाण्यांची मागणी व पुरवठा अनुक्रमे ११.८ टक्क्यांनी व ४.७ टक्क्यांनी कमी राहिला.चलनातील नोटांचे मूल्य आणि संख्या यात अनुक्रमे १६.८ टक्के आणि ७.२ टक्के वाढ झाली आहे. आदल्या वर्षात ही वाढ अनुक्रमे १४.७ टक्के व ६.६ टक्के होती. ३१ मार्च २०२१ रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांचा मूल्याच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात ५०० आणि दाेन हजारांच्या नोटांचे प्रमाण ८५.७ टक्के होते. ३१ मार्च २०२० रोजी या दोन्ही नोटांचे चलनातील एकत्रित मूल्य ८३.४ टक्के होते.रिझर्व्ह बँकेच्या टिपणानुसार, ३१ मार्च २०२१ रोजी चलनात ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक ३१.१ टक्के होते. त्याखालोखाल दहा रुपयांच्या नोटांचे प्रमाण २३.६ टक्के होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक