चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एआय व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भारतात २०३० पर्यंत नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार आहेत. याचवेळी युद्ध तसेच लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा भारताला मोठा फायदा होणार असून, भारत आणि आफ्रिकन देश जवळपास दोनतृतीयांश कामगार जगाला पुरवणार आहेत. त्यामुळे भारतात येत्या काही वर्षांत नोकऱ्यांची लाट निर्माण होणार असून, पदवीसोबतच नवीन कौशल्य (स्किल) शिकणे अतिशय गरजेचे झाले असल्याचे समोर आले आहे. कंपन्या पदवीची अट काढून स्किल असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ)च्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
अहवालानुसार, २०३० पर्यंत १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील, तर ९.२ कोटी नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे निव्वळ ७.८ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एक हजार कंपन्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
कोणत्या नोकऱ्या वाढणार?
कृषी कामगार, वाहनचालक, बांधकाम कामगार, परिचारिका, माध्यमिक शाळेतील शिक्षक, ॲप डेव्हलपर, दुकाने चालवणारे, खाद्यप्रक्रिया आणि संबंधित व्यवसायातील कामगार, प्रकल्प व्यवस्थापक, विद्यापीठातील प्राध्यापक, समुपदेशक.
कोणत्या नोकऱ्या जाणार?
कॅशिअर, तिकीट क्लार्क, प्रशासकीय सहायक, ग्राफिक डिझायनर,इमारतींची देखभाल करणारे, स्वच्छता कर्मचारी, रेकॉर्ड ठेवणारे कर्मचारी, मुद्रण व संबंधित क्षेत्रातील कामगार. लेखापाल, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी, डेटा एंट्री क्लर्क, ग्राहक सेवा कर्मचारी यांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत.
२०३० पर्यंत वाढणारी कौशल्ये
- एआय आणि बिग डेटा ९४%
- तांत्रिक साक्षरता ७४%
- क्रिएटिव्ह विचार करणे ७१%
- सायबर सुरक्षा ६८%
- लवचिकता ६०%
भारतासमोरील अडथळे काय?
- कामगारांकडे कौशल्य नाही ६५%
- संस्थेतील कल्चर ४७%
- उद्योगाकडे कौशल्य असलेले तरुण वळवणे ४०%
- पुरेसा डेटा, तांत्रिक पायाभूत सुविधांचा अभाव ३६%
- संधींची पुरेशी माहितीच नसणे ३२%
मागणी कशाची?
नवीकरणीय ऊर्जा व पर्यावरण अभियांत्रिकीतील तज्ज्ञ, एआय, रोबोटिक्स, बिग डेटा आणि सायबर सुरक्षा यातील तज्ज्ञांची मागणी वाढेल. सर्जनशील विचार, मानसिक आरोग्य चांगले व लवचीकता यांसारखी मानवी कौशल्ये ज्याच्याकडे असतील त्याला भविष्यात मोठी संधी आहे.
आकडेवारी काय सांगते?
एआयचा वापर जगाच्या ८६ टक्क्यांच्या तुलनेत भारतात ८८ टक्के वाढला आहे. रोबोटचा वापर ६० टक्क्यांनी वाढला आहे. तसेच सेमीकंडक्टर व तंत्रज्ञानाचा वापरही ३३ टक्के वाढला आहे.
- ७४% भारतीय लोकांचे रोजगार २०२२ मध्ये असुरक्षित होते.
- ६७% कंपन्या सध्या स्किल असलेल्यांना प्राधान्य देत आहेत.
- ३८% भारतीयांना पुढील ५ वर्षांत नवे कौशल्य आत्मसात करावे लागेल.