लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : भारतीय उद्योग क्षेत्र व्यवसायाबाबतीत आशावादी असून या वर्षाच्या अखेरपर्यंत रोजगार बाजार कोविड-१९ साथपूर्व काळाच्या पातळीवर जाईल, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. मनुष्यबळ क्षेत्रातील समूह ‘नेट एम्प्लॉयमेंट आऊटलूक’ने (एनईओ) जारी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, एप्रिल-जून २०२१ या तिमाहीत रोजगार वृद्धी जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढून ९ टक्के होईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत ती २ टक्क्यांनी कमी आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५६ टक्के कंपन्यांनी म्हटले आहे की, २०२१ च्या अखेरपर्यंत नोकरभरती कोविडपूर्व काळाच्या पातळीवर जाईल. २७ टक्के कंपन्यांनी तर जूनपर्यंतच कोविडपूर्व पातळी गाठली जाईल, असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील २,३७५ रोजगारदाता संस्था सहभागी झाल्या. १२ टक्के संस्थांनी तीन महिन्यांत रोजगार वाढेल, असे म्हटले. २ टक्के संस्थांनी घसरण होईल, असे म्हटले, तर ५३ टक्के संस्थांनी काहीच बदल होणार नाही, असे नमूद केले.रोजगार बाजारात डिजिटल रूपांतरण प्रमुख घटक राहील. जे लोक दूरस्थ पद्धतीने आणि प्रभावीपणे काम करू शकतील, त्यांना अधिक संधी असतील. कौशल्ये विकसित करण्याची मानसिकता असलेल्यांनाही चांगल्या संधी मिळतील. आगामी ६ ते १२ महिन्यांच्या काळासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम आणि प्रत्यक्ष कार्यालय अशा दोन्ही ठिकाणाहून काम दिले जाईल, असे ९२ टक्के संस्थांनी म्हटले आहे.