Join us

कपडे तसेच पादत्राणांच्या किमतीमध्ये होणार वाढ, GST वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 6:29 AM

अधिसूचना : जानेवारीपासून जीएसटी होणार १२ टक्के

ठळक मुद्देजीएसटी कौन्सिलच्या मागील बैठकीमध्येच एक हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या तयार कपडे व पादत्राणांवरील जीएसटीचा दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तयार कपडे व पादत्राणांवरील जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये तयार कपडे व पादत्राणांच्या दरामध्ये  वाढ होणार आहे. 

जीएसटी कौन्सिलच्या मागील बैठकीमध्येच एक हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या तयार कपडे व पादत्राणांवरील जीएसटीचा दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या तयार कपड्यांवर व पादत्राणांवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामध्ये येत्या १ जानेवारीपासून  वाढ करून तो १२ टक्के केला जाणार आहे. सध्या तयार कपडे तसेच सूत आणि सुती कापड यावर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे सुसूत्रता आणण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये झाला. मात्र ५ टक्के असलेला जीएसटी सरसकट १२ टक्के करण्याबाबतची अधिसूचना सरकारतर्फे काढण्यात आली आहे. यामुळे आगामी वर्षामध्ये सर्वच किमतीचे तयार कपडे आणखी महाग होणार आहेत. याशिवाय रग, कांबळे अशा उत्पादनांच्या किमतींमध्येही वाढणार आहेत. याबरोबरच एक हजार रुपयांवरून अधिक किमतीच्या पादत्राणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के वाढविण्याची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. त्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेली पादत्राणेही महाग हाेणार आहेत.

सध्या वस्त्रोद्योग मोठ्या संकटांचा सामना करीत आहे. तयार कपड्यांसाठीच्या कच्च्या मालाच्या दरामध्ये याआधीच वाढ झाली असल्याने तशाही कपड्यांच्या किमती १५ ते २० टक्के वाढणारच होत्या. त्यातच आता जीएसटीमध्येही वाढ झाली असल्याने या किमती वाढण्याची भीती आहे. - राजेश मसंद,अध्यक्ष, सीएमएआय

टॅग्स :जीएसटीव्यवसाय