नवी दिल्ली - देशात हायटेक एक्स्प्रेस वेची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेनंतर, पंतप्रधान मोदींनी अनेक ठिकाणी एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. या एक्सप्रेस वेंवर अथवा द्रुतगती मार्गांवर विविध प्रकारच्या सुविधाही देण्यात येत आहेत. एवढेच नाही तर या मार्गांमुळे प्रवासाचा वेळही अर्ध्यावर आला आहे. आता एवढा मोठा महामार्ग मिळाल्यानंतर, टोल टॅक्सही भरावा लागणारच. एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर, त्या मार्गावर किती टोल-टॅक्स भरावा लागेल? टोल टॅक्ससाठी प्लाझा कुठे असतील? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. अनेकांची हे जाणून घेण्याचीही इच्छा असते. पण काही लोक असेही आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचा टोल टॅक्स द्यावा लागत नाही. हे आपल्याला माहित आहे का?
देशात काही गाड्या अशाही असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचा टोल टॅक्स द्यावा लागत नाही. खरे तर परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात एक यादीही जाहीर केली आहे. यात जवळपास 25 लोकांना टोल टॅक्स द्यावा लागत नाही. भारत सरकारने टोल वसुलीसाठी फास्टॅग सिस्टिम आणली आहे. ही एक कॅशलेस टोल जमा करण्याची प्रक्रिया आहे.
या गाड्यांना टोल टॅक्स द्यावा लागत नाही -भारतात अशी अनेक वाहने आहेत ज्यांना टोल भरण्याची आवश्यकता नाही. यात भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, कुठल्याही राज्याचे राज्यपाल, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशातील लेफ्टनंट गव्हर्नर, पूर्ण सामान्य अथवा समकक्ष दर्जाचे चीफ ऑफ स्टाफ, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संसद सदस्य, लष्करप्रमुखांचे लष्करी कमांडर आणि इतर सेवांमधील समकक्ष, राज्य सरकारचे मुख्य सचिव, भारत सरकारचे सचिव, सचिव, राज्यांची परिषद, लोकसभा, सचिवांच्या वाहनांचा समावेश आहे.
यांनाही मिळते सूट - निमलष्करी दल आणि पोलीसांसह वर्दीतील केंद्रीय आणि राज्यातील सशस्त्रदल, कार्यकारी दंडाधिकारी, अग्निशामक विभाग, शव घेऊन जाणारी वाहने यांनाही टोल टॅक्स द्यावा लागत नाही. याशिवाय, राजकीय दौऱ्यावर आलेल्या परदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, एखाद्या राज्यातील विधानसभेचा सदस्य, तसेच एखाद्या राज्यातील विधानपरिषदेच्या सदस्याने संबंधित विधीमंडळाने दिलेले ओळखपत्र दाखवल्यास, त्यालाही टोल टॅक्स द्यावा लागत नाही.