नवी दिल्ली : जग आता ग्लोबल व्हिलेज बनले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना एका देशातून दुसऱ्या देशात जावे लागते. याशिवाय लोकांना चांगले आयुष्य आणि पैशाच्या शोधात विदेशात काम करायलाही आवडते. मात्र, विदेशातील जीवन म्हणावे तितके सोपे नाही. जर तुम्हाला बाहेरून जास्त पगार मिळेल असे वाटत असेल तर तिथल्या खर्चाकडेही लक्ष द्यावे लागेल. दरम्यान, जगातील अशा दहा स्वस्त देशांबद्दल जाणून घ्या...
या यादीतील आशियाई देश अजूनही बाहेरून कामासाठी येणाऱ्यांसाठी स्वस्त आहेत. युनायटेड नेशन्सच्या (United Nations) अहवालानुसार जवळपास २३ कोटी लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये कामासाठी जात आहेत. आपला देश सोडून नवीन ठिकाणी नोकरीसाठी आलेल्या या लोकांनाही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. इंटरनेशन्सने (InterNations)आपल्या ताज्या सर्वेक्षणात राहणीमानाचा खर्च, महागाई आणि राहणीमानाच्या गुणवत्तेच्या आधारावर सर्व देशांची रँकिंग लावली आहे.
या सर्वेक्षणात ५३ देशांचा समावेश करण्यात आला आहे. व्हिएतनाम हा परदेशी लोकांसाठी काम करण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त देश असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आशियातील टॉप १० स्वस्त देशांच्या यादीत व्हिएतनाम व्यतिरिक्त, इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावर, फिलिपाइन्स पाचव्या, भारत सहाव्या, थायलंड आठव्या आणि चीन दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, या यादीत सिंगापूरची लक्षणीय घसरण झाली असून तो ४८व्या स्थानावर पोहोचला आहे. या देशांमध्ये बाहेरून कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वस्त अन्न, घर आणि प्रवासाचे पर्याय उपलब्ध आहेत. या यादीत ब्राझील नवव्या स्थानावर आहे.
याचबरोबर, अहवालानुसार, या १० देशांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे काम करणारे लोक असा दावा करतात की, त्यांची कमाई या देशांमध्ये होणारा खर्च भागवण्यासाठी पुरेशी नाही. यामध्ये मध्यपूर्वेतील तीन देशांचा समावेश आहे. बहरीन (४६व्या), तुर्की (४५ व्या) आणि कुवेत (४४व्या) असे हे देश आहेत. याशिवाय न्यूझीलंड, नॉर्वे, आयर्लंड, ब्रिटन, फिनलंड आणि कॅनडा हेही परदेशी लोकांना काम करण्यासाठी खूप महागडे देश आहेत.