EPFO Aadhaar seeding : तुम्ही जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओने नुकताच आपल्या काही कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांना EPFO क्लेम सेटलमेंटसाठी आधार सीडिंगची (Aadhaar seeding) गरज भासणार नाही. पूर्वी क्मेल करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी जोडणे बंधनकारक होते. पण आता EPFO ने या नियमात बदल करुन काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आधार सीडिंगमधून सूट दिली जाईल. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना यात सूट देण्यात आलेली नाही.
आधार सीडिंगमधून कोणाला मिळणार सूट?
- आंतरराष्ट्रीय कामगार : असे कामगार जे भारतात काम करुन त्यांच्या देशात परतले. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. या कर्मचाऱ्यांसाठी आता आधार अनिवार्य असणार नाही.
- भारतीय नागरिक: ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि ज्यांनी इतर कोणत्याही देशात जाऊन नागरिकत्व घेतले आहे, त्यांनाही आधार सीडिंगमधून सूट दिली जाईल.
- नेपाळ आणि भूतानचे नागरिक : या देशातील असे आहेत जे EPF&MP कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांमध्ये काम करतात. परंतु, ते भारतात राहत नाहीत आणि त्यांच्याकडे आधार नाही.
आधारला पर्याय कोणते?
या श्रेणींमध्ये येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आधारऐवजी पासपोर्ट किंवा नागरिकत्व प्रमाणपत्रासारख्या इतर पर्यायी कागदपत्रांद्वारे त्यांची ओळख सिद्ध करण्याची सुविधा दिली जाईल.
विशेषत: नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांसाठी नागरिकत्व प्रमाणपत्र वैध आहे.
ईपीएफओने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार नाही त्यांच्या बाबतीत ड्यू डिलिजेन्स (due diligence) म्हणजेच तपास पूर्ण काळजीने केला जाईल. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांचे सर्व तपशील योग्यरित्या रेकॉर्ड केले जातील. त्यांना मंजूरी देण्यापूर्वी ऑफिस-इन-चार्ज (OIC) कडून पुष्टी केली जाईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याची शिल्लक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक खाते देखील तपासले जाणार आहे. तसेच कंपनी अथवा मालकाकडून त्याची खातरजमा केली जाईल.