लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पैशाशी संबंधित अनेक नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. असे न झाल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
नोट बदलून घ्या
रिझर्व्ह बँकेनं सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर या नोटा चालणार नाहीत. त्यामुळे २ हजार रुपयांची नोट नक्कीच बदलून घ्या.
खातं होईल फ्रीज
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर ते खाते १ ऑक्टोबरपासून गोठवले जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही.
बचत खात्यासाठी आधार
आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आले आहे. पीपीएफ, सुकन्या समृद्धी, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून ही खाती गोठवली जातील.