माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर क्राइमचे बळी ठरले आहेत. त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. यासंबंधी गुन्हा दाखल झाला असला तरी आपल्या नकळत पैसे कसे काढले जाऊ शकतात, त्यावर उपाय काय, असे प्रश्न पडणे साहजिक आहे. जाणून घेऊया... चोर कसे काढून घेतात तुमच्या बँक खात्यातून पैसे... या फसवणुकीसाठी काय आहेत उपाय...
नेमके काय घडले...
बँक अधिकारी म्हणून एका व्यक्तीने विनोद कांबळी यांना फोन केला. त्यानंतर लिंक पाठवली. कांबळीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर घडले वेगळेच. काही वेळाने त्याच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे काढण्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला.
हे घडते कसे?
तुम्हाला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे एक लिंक पाठवली जाते.
त्या लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया पार पाडा, असे सांगितले जाते.
अशा लिंक्सद्वारे तुमच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळवला जाऊ शकतो. स्क्रिन शेअरिंग केले जाऊ शकते.
त्यातून तुमच्या फोनमधील सर्व माहिती ऑनलाइन चोरांच्या हाती लागते आणि बँकेतून सहज पैसे काढले जातात.
काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
तसेच अनोळखी वा फसवे वाटणारे एसएमएस किंवा मेल ओपन न करता तातडीने नष्ट करावेत.
ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांसाठी लागणारे पासवर्ड संबंधित बँक वा ई-कॉमर्सच्या संकेतस्थळावर टाकायचे असतील तेव्हा त्या संकेतस्थळाची सत्यता काळजीपूर्वक तपासावी. संशय आल्यास व्यवहार करू नये.