Join us

मोटर इन्शूरन्स पोर्ट करण्याच्या विचारात आहात का? मग जाणून घ्या या गोष्टी, फायद्यात राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 6:15 PM

मोटर विमा घेताना या गोष्टींनी नक्कीच काळजी घ्यावी, अन्यथा करावा लागू शकतो समस्यांचा सामना.

आपण एखाद्या मोटर कंपनीचा विमा विकत घेतो आणि कालांतरानं काही कारणांमुळे आपण त्यात अडकलोय असं आपल्याला वाटायला लागतं. यावर मिळणारे लाभ न गमावता आपल्याला दुसऱ्या कंपनीचा विमा घेता येईल का असा प्रश्नही आपल्या मनात येतो. याचं उत्तर हो असं आहे. तुम्ही आपली मोटर विमा पॉलिसी दुसऱ्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये ट्रान्सफर करू शकता. याची प्रक्रिया कठिण आहे की सोपी हे आपण पाहूया.

पॉलिसी पोर्ट करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे त्याच्या नुतनीकरणाची वेळ. तुमची विमा पॉलिसी कोणत्याही समस्येशिवाय पोर्ट करायची असेल तर त्यासाठी पॉलिसीची तारीख संपण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पॉलिसीच्या एक्सपायरी तारखेच्या किमान ४५ दिवस आधी ही प्रक्रिया सुरू करू शकता.

कसा कराल पोर्ट?तुम्हाला कोणत्या विमा कंपनीसोबत जायचं आहे हे ठरवल्यानंतर तुम्ही त्या कंपनीच्या एजंटशी किंवा कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन प्रक्रियाकरू शकता. त्यानंतर प्रपोजल फॉर्म भरण्यासारख्या आवश्यक औपचारिकता पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या अॅक्टिव्ह पॉलिसी किंवा लॅप्स पॉलिसीचे तपशील देखील शेअर करावे लागतील. पॉलिसी लॅप्स झाली असल्यास, वाहनाची तपासणी करण्याची गरज भासू शकते. तुम्हाला सध्याच्या विमा कंपनीचे तपशील, पॉलिसी क्रमांक आणि तुम्ही केलेल्या कोणत्याही क्लेमचे तपशील भरावे लागतील. सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तुमचा सध्याचा नो क्लेम बोनस (NCB) नमूद करणं आवश्यक आहे. यावरच तुम्हाला पुढील स्लॅब वाढवता येऊ शकेल आणि तुम्हाला नो क्लेम बोनसचा पुढेही लाभ घेता येऊ शकेल.

तुम्ही विद्यमान योजना आणि सेवेबाबत समाधानी नसल्यामुळे, विमा कंपनी बदलण्यापूर्वी तुम्ही कागदपत्रांची योग्यरित्या पडताळणी करून घ्या. दाव्यात विम्याची सत्यता संपूर्णपणे सांगावी लागते. इतर कोणत्याही गोष्टीपूर्वी तुम्ही विमा कंपनीच्या क्लेम-पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन केलं पाहिजे. तुम्‍हाला हवं असल्‍यास तुम्ही ज्या सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन दुरुस्त करता त्यांच्याशी बोलू शकता. तसंच क्लेमची गरज भासल्यास कोणती कंपनी सर्वोत्तम आहे याची विचारणाही करून घ्या. यात तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल.

याव्यतिरिक्त, विमा कंपनीच्या आर्थिक स्थितीचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांचे सॉल्व्हेंसी रेशो पहा. सॉल्व्हन्सी रेशो विमा कंपनीचा त्याच्या क्लेमच्या तुलनेत रोख प्रवाह दर्शवितो. विमा नियामकाने सर्व विमा कंपन्यांना 1.5 किंवा 150% सॉल्व्हन्सी गुणोत्तर राखणं अनिवार्य केलंय.

अॅड ऑन सुविधाया पॅरामीटर्स व्यतिरिक्त, विमा कंपन्यांद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि अॅड-ऑन कव्हर्सची माहिती तुम्हाला योग्य विमा कंपनी निवडण्यात मदत होईल. कॅशलेस क्लेम सेटलमेंटचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही विमा कंपनीचं नेटवर्क गॅरेजेस देखील पहावी. फक्त नेटवर्क गॅरेजची संख्या बघू नका, तर तुमच्या जवळ असलेल्या गॅरेजकडेची सेवाही पाहा.

केवळ प्रीमिअम पाहू नकासर्वात महत्त्वाचं म्हणजे, नवीन विमा कंपनीचा शोध घेत असताना केवळ प्रीमिअम पाहून निर्णय घेऊ नका. विमा कंपनीच्या क्लेमच्या क्षमतेचं मूल्यांकन करा. प्रीमिअम कमी असला आणि तुम्ही ती पॉलिसी घेतली तर क्लेमच्या वेळी समस्या होणार नाहीत ना याची खात्री करा, अन्यथा तुम्हाला अनेक समस्याचा सामना करावा लागू शकतो. क्लेमच्या रकमेच्या तुलनेत विम्याची किंमत खूपच कमी असते. त्यामुळे एका चांगल्या विमा कंपनीची निवड करा.

टॅग्स :कार