Join us

बाजाराच्या वाढीचा सलग तिसरा सप्ताह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:10 AM

स्थिरावत असलेला रुपया आणि खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किमतींच्या जोडीलाच परकीय वित्तसंस्था, तसेच देशी परस्पर निधींकडून होत असलेली खरेदी आणि चलनवाढीचा कमी झालेला दर यामुळे शेअर बाजारात आशादायक वातावरण राहिले.

- प्रसाद गो. जोशी

स्थिरावत असलेला रुपया आणि खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किमतींच्या जोडीलाच परकीय वित्तसंस्था, तसेच देशी परस्पर निधींकडून होत असलेली खरेदी आणि चलनवाढीचा कमी झालेला दर यामुळे शेअर बाजारात आशादायक वातावरण राहिले. निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये वाढ दर्शविली. दरम्यान, जगभरात मात्र अर्थव्यवस्थांच्या विकास दरामध्ये होत असलेल्या घटीमुळे चिंतेचे वातावरण दिसून आले.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ ३५२८७.४९ असा वाढीने झाला. त्यानंतर, बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५५४५.८५ ते ३४६७२.२० अंशांच्या दरम्यान वर-खाली होत अखेरीस ३५४५७.१६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २९८.६१ अंश (०.८५%) वाढ झाली.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मागील सप्ताहापेक्षा ९७ अंशांनी (०.९१ टक्के) वाढून १०६८२.२० अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप निर्देशांकामध्येही ५३.६१ अंशांची किरकोळ वाढ होऊन तो १४९९७.८१ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप या बाजाराच्या अन्य प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकामध्ये मात्र या सप्ताहात मोठी घट झाली. तो १८५.९७ अंशांनी घसरून १४,४८५.८८ अंशांवर बंद झाला.गेल्या महिनाभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढत आहे. गतसप्ताहामध्ये रुपया सातत्याने वाढला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये सुरू असलेले अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध आणि अमेरिकेतील स्थिर झालेले व्याजदर यामुळे भारतातील परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम म्हणून डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन मजबूत होताना दिसत आहे.गतसप्ताहामध्ये जाहीर झालेला चलनवाढीचा दर हा बाजाराच्या वाढीला पोषक ठरला आहे. आॅक्टोबर महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ३.३१ टक्के असल्याचे जाहीर झाले आहे. तत्पूर्वीच्या महिन्यात तो ३.७१ टक्के होता.

टॅग्स :शेअर बाजार