Join us  

तिसऱ्या दिवशीही उच्चांक, सेन्सेक्स ८४ हजार पार; अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीमुळे बाजारात गती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 5:48 AM

सेन्सेक्सने एका टप्प्यावर ८४,६९४ अंकांची आजवरची सार्वकालिक झेप घेतली होती तर निफ्टीनेही २५,८४९ अंकांचा विक्रम नोंदवला होता.

मुंबई : शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही बाजाराने सार्वकालिक उच्चांक सर केला तर सेन्सेक्सने ८४ हजारांचा टप्पा पार केला. सेन्सेक्स दिवसअखेरीस १,३५९ अंकांच्या वाढीसह ८४,५४४ वर स्थिरावला तर निफ्टी ३७५ अंकांनी वाढून २५,७९० वर बंद झाला. सेन्सेक्सने एका टप्प्यावर ८४,६९४ अंकांची आजवरची सार्वकालिक झेप घेतली होती तर निफ्टीनेही २५,८४९ अंकांचा विक्रम नोंदवला होता.

चालू सप्ताहात सेन्सेक्स १,६५४ अंकांनी वाढला. गुरुवारी सेन्सेक्सने सलग दुसऱ्या दिवशी ८३,७७३ अंकांची तर निफ्टीने २५,६११ अंकांपर्यंत झेप घेतली होती. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, टाटा स्टील, लार्सन ॲण्ड ट्युब्रो, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल आणि अदानी पोर्ट्स यांचे शेअर्स वाढले.

तेजीमागे नेमकी कारणे काय?

nअमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात केल्यामुळे पुढील बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनही व्याजदरात कपात केली जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी मांडला आहे.

nमिडकॅप व स्मॉलकॅप समभागांनी काही दिवसांत नफावसुली केल्यानंतर शुक्रवारी जोरदार खरेदी केली. त्यामुळे मिडकॅपमध्ये १.१६ टक्के तर स्मॉलकॅपमध्ये १.३७ टक्के वाढ झाली.

nअमेरिकन फेडने व्याजदर घटविल्याने बाजारात तरलता वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचे भारतीय बाजाराबाबत आकर्षण वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेअर बाजार