नवी दिल्ली – महागाईची झळ सोसणाऱ्या जनतेला आता पुढील महिन्यापासून आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कार, बाईकसह सर्व गाड्यांचे थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाने वाहनांवरील इन्शुरन्स विमा १ जूनपासून वाढ लागू होणार आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचां इन्शुरन्स महाग होणार आहे.
मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की, १ हजार इंजिन सीसी क्षमता असणाऱ्या खासगी वाहनांचा प्रीमियम २०१९-२० मध्ये २०७२ रुपयांवरून आता २०९४ रुपये होणार आहे. याचप्रकारे १ हजार ते दीड हजार सीसी इंजिन असलेल्या खासगी वाहनांना प्रीमियम ३ हजार २२१ रुपये ऐवजी आता ३ हजार ४१६ रुपये भरावे लागतील. तर १५०० हून अधिक सीसी खासगी वाहनांना थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये काहीशी घट केली आहे. ७ हजार ८९७ वरून आता ७ हजार ८९० रुपये भरावे लागतील. याचप्रकारे १५० ते ३५० सीसीपर्यंत दुचाकी वाहनांना १ हजार ३६६ रुपये असतील. तर ३५० हून अधिक सीसी दुचाकी वाहनांसाठी २ हजार ८०४ रुपये मोजावे लागतील.
कोविड महामारीचं कारण देत २ वर्ष दरवाढीत सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन दर १ जूनपासून लागू होतील. या दराबाबत भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सूचना जारी केली आहे. पहिल्यांदाच थर्ड पार्टी दर निश्चित करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर हायब्रिड इलेक्ट्रीक वाहनांच्या प्रीमियमवर ७.५ टक्के सूट देण्यात आली आहे. तर ३० किलोव्हॅटहून अधिक इलेक्ट्रीक खासगी वाहनांवरील प्रीमियम १ हजार ७८० रुपये असतील. त्याचसोबत १२ हजार ते २० हजार किलो माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचे प्रीमियम ३५ हजार ३१३ रुपये भरावे लागतील. तर ४० हजाराहून अधिक किलो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रीमियम ४४ हजार २४२ रुपये भरावे लागणार आहेत. ३० किलोहून अधिक व्हॅट प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी २ हजार ९०४ रुपये द्यावे लागतील.