सुरत : अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनपेक्षाही आकाराने मोठ्या सुरत डायबंड बोर्स इमारतीचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीत तब्बल दीड लाख जणांना रोजगार मिळणार आहेत. सुरत शहराच्या शिरपेचात आज आणखी एक हिरा खोवला गेला. हा हिरा लहानसहान नसून जगातील सर्वश्रेष्ठ हिरा आहे, असे उद्गार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काढले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगात आता जेव्हा जेव्हा डायमंड बोर्स असा उल्लेख होईल तेव्हा सुरतचे नाव पुढे येईल. या इमारतीतून भारतीय डिझाइन, भारतीय संकल्पना, भारतीय कारागिरांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. या रूपाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नवे केंद्र तयार झाले आहे.
याच दौऱ्यात पंतप्रधानांनी १६० कोटींचा खर्च करून बांधलेल्या सुरत विमानतळाच्या इमारतीचे उद्घाटन केले. याला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
मोदींच्या ‘गॅरंटी’ची चर्चा
पंतप्रधान म्हणाले की, सध्या जिकडे- तिकडे मोदींच्या गॅरंटीची चर्चा सुरू आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे. येथील कारागिरांनी मोदींची गॅरंटी प्रत्यक्षात अवतरताना पाहिली आहे. सुरत डायमंड बोर्स हेही याच गॅरंटीचे उदाहरण आहे. सुरतच्या हिऱ्याची चमक वेगळीच असते. जगभरात याची ओळख आहे.
इमारतीची वैशिष्ट्ये
या इमारतीत एकूण नऊ टॉवर आणि १५ मजले आहेत. नऊ आयताकृती टॉवर्स एकमेकांना जोडलेले आहेत. बांधकाम एकूण ३५.५४ एकरांवर पसरले आहे.
ही सर्वांत मोठी एकमेकांशी जोडलेली आणि कार्यालयांची इमारत ठरणार आहे. इथे ४,५०० हून अधिक कार्यालये आहेत. इमारतीत सुमारे ६५ हजार लोक ये-जा करू शकतात.
इमारत बांधण्यासाठी ३,४०० कोटी रुपयांचा खर्च आला. बांधकाम फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाले आणि एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण झाले.
ही इमारत दिल्लीतील वास्तुविशारद सोनाली आणि मनित रस्तोगी आणि त्यांची कंपनी मॉर्फोजेनेसिस यांनी तयार केली आहे.
अमेरिकेच्या पेंटागॉनच्या इमारतीचा विस्तार ६५ लाख चौरस फूट आहे तर सुरत डायमंड बोर्सचा विस्तार ६७ लाख चौरस फूट आहे. इमारतीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे.
या कॅम्पसमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, कॉन्फरन्स हॉल, मल्टिपर्पज हॉल, रेस्टॉरंट्स, बँका, कस्टम क्लिअरन्स हाऊस, प्रशिक्षण केंद्र, मनोरंजन क्लब आदी सुविधा आहेत.