Join us  

हाच फंड वाढवून देईल आमच्या बचतीचे पैसे; इक्विटी म्युच्युअल फंडात ६६.७ लाख कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 9:58 AM

जून २०२४ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात ४०,६०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - काटकसरीने केलेली बचत नागरिक चांगला परतावा मिळण्याच्या आशेने विविध पर्यायांमध्ये गुंतवीत असतात. बहुसंख्य गुंतवणूकदरांनी यासाठी मागील काही दिवसांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाला पसंती दिल्याचे दिसत आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एम्फी) आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात तब्बल ३८,२३९ कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत यात ३.३ टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या सर्व महिन्यांचा विचार केला असता ऑगस्ट महिना विक्रमी गुंतवणूक देणारा दुसरा महिना ठरला आहे. जून २०२४ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात ४०,६०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

कशात किती गुंतवले?इक्विटी योजनांच्या अंतर्गत सेक्टर किंवा थिमॅटिक फंडात सर्वाधिक १८,११७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात सहा नव्या फंडाच्या ऑफर सादर झाल्या. यातील पाच थिमॅटिक फंडांमध्ये १०,२०२ कोटींची गु्ंतवणूक करण्यात आली. सर्वाधिक १५,१०६ कोटींची गुंतवणूक ओव्हरनाईट फंडात करण्यात आली आहे. गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेट फंडामध्ये (इटीएफ) ऑगस्टमध्ये एकूण १,६११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जुलैमध्ये हेच प्रमाण १,३३७ कोटी इतके होते.

गुंतवणुकीत किती वाढ?इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनाधीन रकमेत (एएमयू) ऑगस्टमध्ये वाढ झाली. या फंडातील व्यवस्थापनाधीन रक्कम ६६.७ लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. हा आजवरचा सार्वकालिक विक्रम ठरला आहे. 

एसआयपीद्वारे गुंतवणुकीचाही विक्रम एसआयपीद्वारे केली जाणारी गुंतवणूक ऑगस्टमध्ये २३,३३२ कोटींच्या विक्रमी उंचीवर पोहोचली आहे. एकूण पोर्टफोलिओंची संख्या २० कोटींहून अधिक झाली आहे. यातील १४.३ टक्के पोर्टफोलिओ इक्विटीचे आहेत.

टॅग्स :गुंतवणूक