Join us  

Adani Group : 'हा भारतावर हल्ला...!' अदानी ग्रुपनं हिंडनबर्गच्या आरोपांवर दिलं 413 पानांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:46 AM

एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहे, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे.

नवी दिल्ली :अदानी ग्रुपकडून (Adani Group) रविवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ग्रुपने हिंडनबर्गच्या (Hindenburg) आरोपांवर 413 पानांचे उत्तर दिले आहे. यात अदानी ग्रुपने हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर 24 जानेवारीला 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहे, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे.

पैसा छापण्यासाठी आलाय अहवाल -गुंतवणूकदारांचे नुकसान करत शॉर्ट सेलिंगच्या माध्यमाने मोठा नफा कमावण्यासाठी हिंडनबर्ग सिक्युरिटीज एक खोटा बाजार तयार करण्याचा प्रयत्नकरत आहे. अदानी ग्रूपने म्हटले आहे, 'हा अत्यंत चिंतेचा विषय आहे की, कुठल्याही विश्वसनियते शिवाय अथवा एथिक्सपासून हजारो मैल दूर असलेल्या एका संस्थेच्या विधानाने आपल्या गुंतवणूकदारांवर गंभीर परिणाम झाला आहे. या अहवालाचा वाईट हेतू त्याच्या वेळेवरूनही स्पष्ट होतो. कारण अदानी एंटरप्रायजेस इक्विटी शेअर्सचा देशातील सर्वात मोठा एफपीओ (Adani Enterprises FPO) घेऊन येण्याच्या तयारीत असतानाच हा अहवाल आला आहे.

हा भारतावरील हल्ला - अदानी ग्रुपने म्हटले आहे, की 'हा केवळ एखाद्या विशिष्ट कंपनीवर करण्यात आलेला अवास्तव हल्ला नाही. तर भारत आणि भारतातील स्थंस्थांनांचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता तसेच भारताच्या विकासाची गाथा आणि देशाच्या महत्त्वाकांक्षेवर नियोजित हल्ला आहे.'

अदानी ग्रुपने सांगितल्या हिंडनबर्ग रिपोर्टच्या तीन मुख्य थीम्स -

1. - खोटी कहाणी पसरवण्यासाठी आधीपासूनच पब्लिक डोमेनमधील प्रकरणांचे सिलेक्टिव्ह आणि मॅनिपुलेटिव्ह प्रेझेंटेशन.

2. - लिगल आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि इंडस्ट्री प्रॅक्टिसचे पूर्ण अज्ञान अथवा जाणूनबुजून अवहेलना करणे.

3. - नियामक आणि न्यायव्यवस्थेसह भारतीय संस्थांचा पूर्णपणे अवमान. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसाय