Join us

सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी! ऑगस्टमध्ये चांदी स्वस्त; दिवाळीत भाव वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:38 PM

२०२३-२४ हे आर्थिक वर्ष सोन्यासाठी अत्यंत निराशाजनक असे म्हणावे लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सोन्याला आजही सर्वात सुरक्षित आणि विश्वासाची गुंतवणूक मानले जाते. परंतु २०२३-२४ हे आर्थिक वर्ष सोन्यासाठी अत्यंत निराशाजनक असे म्हणावे लागेल. मागील तीन महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. परंतु यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक चांगलेच खूश झालेले दिसत आहेत.

मार्च २०२३ मध्ये सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते. , हे विसरता येणार नाही. सध्या जगभरचे नागरिक अमेरिकेच्या आर्थिक स्थिरतेबाबत साशंक झालेले दिसत आहेत. तेथील अनेक बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

आता फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केल्याने तसेच बॉन्ड यील्डसह डॉलर मजबूत स्थितीत आल्याने जागतिक बाजारात सोने मागील पाच महिन्यांतील सर्वात कमी किमतीवर पोहोचले आहे. मागील आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचे दर १.४ टक्क्यांनी घसरले आहेत. (वृत्तसंस्था) 

सोमवारचे दर नेमके किती?

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ५९ ते ६० हजारांदरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते मागील सव्वा महिन्याच्या नीचांकी पातळीवर आल्याचे दिसून आले. अधिक मासामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. 

-५८,८०० रुपये साेने प्रति तोळा- ७१,००० रुपये चांदी प्रति किलो

परकीय चलन साठ्यात सोने वाढले

  • भारताच्या परकीय चलनसाठ्यात सोन्याचा साठा वाढला आहे. ही वाढ कोरोना साथीनंतर एक टक्क्याहून अधिक इतकी आहे. 
  • १८ ऑगस्ट रोजी एकूण परकीय चलनापैकी सोन्याचा साठा ७.३६ टक्के इतका होता, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली. 
  • सोन्याचा हाच साठा कोरोनापूर्व काळात ३ जानेवारी २०२० रोजी ६.०८ टक्के इतका होता.

 

  • ६५,००० - रुपये इतका दिवाळीपर्यंत सोन्याचा दर पोहोचू शकतो.
  • ७६,००० - रुपये प्रतिकिलो दर चांदीचा होऊ शकतो.
टॅग्स :सोनं