शेअर बाजारामध्ये विविध शेअर विक्रीसाठी उपलब्ध असतात. प्रत्येक कंपनीच्या शेअरची किंमत ही वेगवेगळी असते. शेअर मार्केटमधील काही शेअर हे स्वस्त असतात. तर काही शेअर हे खूप महाग असतात. भारतामध्ये एमआरएफच्या शेअरची किंमत सर्वाधिक आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत ही सध्या ८४ हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र जगात यापेक्षा महागडे शेअर्सही आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या शेअरबाबत माहिती देणार आहोत. हा शेअर जगातील सर्वात महागड्या शेअरपैकी एक आहे.
वर ज्या सर्वात महागड्या शेअरचा उल्लेख केला त्याचं नाव Berkshire Hathaway असं आहे. या कंपनीच्या एका स्टॉकची किंमत ही हजारो किंवा लाखो रुपये नाही तर कोट्यवधींमध्ये आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला Berkshire Hathaway कंपनीचा एक शेअर जरी खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. तेव्हा कुठे एक शेअर तुमच्या पदरात पडेल.
सध्या Berkshire Hathaway च्या एका शेअरची किंमत ही ४ लाख ६७ हजार ६६० अमेरिकन डॉलर एवढी आहे. म्हणजेच जर तुम्हाला हा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल ३ कोटी, ८३ लाख, ३८ हजार, ४३९.४४ रुपये एवढी रक्कम खर्च करावी लागेल. त्यानंतरच या कंपनीचा एक शेअर तुम्हाला मिळेल. बर्कशायर हॅथवे इंक ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी समूह आहे. त्याचं मुख्यालय नेब्रास्का, अमेरिका येथे आहे.
ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. तसेच जगात महसुलाच्या दृष्टीने सर्वात मोठी वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे. प्रख्यात गुंतवणुकदार वॉरेन बफे हे या कंपनीचे चेअरमन आहेत. या कंपनीचे शेअर महाग असण्याचं कारण म्हणजे या कंपनीने कधीही आपले समभाग स्प्लिट केलेले नाहीत. २३ ऑक्टोबर २००६ रोजी पहिल्यांदाच या कंपनीचा स्टॉक हा १००,००० डॉलरच्या पुढे गेला होता.