Join us

हा आठवडा सावध व्यवहारांचा! आता कंपन्यांच्या तिमाही निकाल आणि चलनवाढीवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:17 PM

गत सप्ताहामध्ये बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक नोंदविला.

- प्रसाद गो. जोशीया वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजार काही प्रमाणात खाली आल्यानंतर गत सप्ताहामध्ये त्यात वाढ झाली. आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणारे अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल आणि चलनवाढीची आकडेवारी यावरच बाजाराची नजर राहणार असून त्यावर बाजाराची वाटचाल राहणार आहे. याशिवाय डॉलरचे आणि खनिज तेलाचे दर, परकीय वित्तसंस्थांची कामगिरी यावर आपल्या बाजाराची कामगिरी अवलंबून असेल.

गत सप्ताहामध्ये बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक नोंदविला. सप्ताहामध्ये सेन्सेक्समध्ये ५४२.३० अंशांनी वाढ होऊन तो ७२,५६८.४५ अंशांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये वाढ होऊन तो २१,८९४.५५ अंशांवर बंद झाला. गत सप्ताहामध्ये हा निर्देशांक १८३.७५ अंशांनी वर चढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वाढ सुरूच असून हे निर्देशांक अनुक्रमे १६६.८८ आणि ६८४.३१ अंशांनी वर जाऊन ३७,८७५.४३ व ४४,५०३.७० अंशांवर बंद झाले आहेत. 

गत सप्ताहामध्ये बाजाराला दोन गोष्टींचा फटका बसला. औद्योगिक उत्पादनामध्ये घट झाल्याने बाजारावर काही प्रमाणात घट झाली. त्याचप्रमाणे चलनवाढीचा दरही वाढल्याने बाजार काहीसा नाराज आहे. त्यातच व्याजदरांबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारही सावधपणे व्यवहार करीत आहेत. बाजारात बरीच उलथापालथ होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा सप्ताह सावध व्यवहारांचा असणार आहे. 

परकीय वित्तसंस्था खरेदीच्या मूडमध्ये बाजारामध्ये परकीय वित्तसंस्था या खरेदीच्या मूडमध्ये दिसून आल्या. चालू महिन्याच्या १२ दिवसांमध्ये या संस्थांनी ३,६८४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. याशिवाय संस्थांनी बॉण्ड्समध्ये ७,९१२ कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यामुळे या संस्था पुढील आठवड्यात कशी भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार