Gold-Silver Vs Sensex-Nifty Return: हे वर्ष केवळ शेअर बाजारासाठीच नव्हे तर सराफा बाजारासाठीही दररोज नवा इतिहास रचत आहे. शेअर बाजार वधारला की सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. परंतु यावेळी तसं होताना दिसत नाही. सोन्या-चांदीसोबतच सेन्सेक्स आणि निफ्टीही रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहेत. या शर्यतीत सोन्या-चांदीनं सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकलं आहे.
जर आपण वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर परताव्याची तुलना केली तर, या वर्षी आतापर्यंत सोन्यानं आपल्या गुंतवणूकदारांना १३ टक्के परतावा दिला आहे, तर चांदीनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ८ टक्के परतावा दिलाय. दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांपैकी एनएसई निफ्टी ४.६५ टक्क्यांनी वधारला आहे, बीएसई सेन्सेक्स ३.८३ टक्क्यांनी वधारलाय. तर बँक निफ्टी निर्देशांक या वर्षी सुमारे १.५६ टक्क्यांनी वधारलाय. असं असतानाही सोन्या-चांदीनं सर्वांना मागे टाकलंय.
का वाढतायत भाव?
यूएस फेडच्या दरात कपात आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी सुरू ठेवल्याची चर्चा आणि इक्विटीला चालना देणारे ट्रिगर यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावासारख्या जागतिक अनिश्चिततेशी संबंधित घटकांनी सराफा बाजारातील तेजीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सोन्याची चमक शेअर बाजारापेक्षा अधिक का?
“भारतीय शेअर बाजार ऑक्टोबर २०२३ च्या अखेरीपासून एक उत्कृष्ट कामगिरी करणारा आहे आणि २०२४ मध्ये आतापर्यंत त्याची गती कायम ठेवली आहे. सर्वाधिक देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित केलीये, तो सेन्सेक्स निफ्टी नाही. तो निफ्टी नेक्स्ट ५० आहे. ज्यानं सर्वांचं लक्ष आणि पैसा आपल्याकडे खेचला आणि त्यात १९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यानं यावर्षी सहजच मेटल्सच्या किंमतीना मागे टाकलंय," अशी प्रतिक्रिया पेस ३६० चे सह-संस्थापक आणि मुख्य जागतीक रणनितीकार अमित गोयल यांनी सांगितलं.
शेअर मार्केट वाढण्यामागचं कारण?
“निफ्टी ५० आणि सेन्सेक्सनं अभूतपूर्व उच्चांक गाठला आहे, जो गुंतवणूकदारांच्या मजबूत भावना आणि भारताच्या आर्थिक शक्यतांवरील विश्वास दर्शवतो. या वाढीदरम्यान, सोने आणि चांदी वर्ष-दर-वर्ष (YTD) कामगिरीमध्ये शेअर बाजारातील परताव्यांना मागे टाकत उत्कृष्ट कामगिरी करणारं समोर आल्याची प्रतिक्रिया पीएचडीसीआयमध्ये कॅपिटल मार्केट आणि कमोडिटी मार्केट कमिटीचे चेअरमन बीके सभरवाल यांनी दिली.