लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि सध्या कंपन्यांत काम करणाऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात पुढील काही वर्षांमध्ये तब्बल १.२ कोटी नोकऱ्या उपलब्ध होतील, तसेच देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.१ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान आणि डिजिटलच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून, पुढील काही वर्षांत या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहेत. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील. एकूण रोजगाराच्या १७ टक्के संधी अत्यंत कुशल आणि विशेष तज्ज्ञ कर्मचारी किंवा व्यावसायिक कामगारांना उपलब्ध असतील, असे अहवालात म्हटले आहे.
मागणीमुळे नोकरीच्या संधीत होणार झपाट्याने वाढ
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय स्कीम) योजना आणि परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) मुळे मागणी खूप वेगाने वाढत आहे. संशोधनानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मध्ये अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवांचे योगदान वाढेल आणि नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे अहवालात म्हटले आहे.
रोजगाराची संधी २७ टक्क्यांनी वाढणार
या तिन्ही क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींमध्ये २५ ते २७ टक्के वाढ होणार आहे. कुशल किंवा विशेष कौशल्याची मागणी आज ४५,६५,०० वरून २०२६ पर्यंत ९०,००,००० पर्यंत वाढेल. या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार आणि डिजिटलायझेशन झाल्याने उच्च-कुशल आणि विशेष प्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढेल. २०२६ पर्यंत ही मागणी दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
पगारात दोन अंकी वाढ मिळणार?
nअहवालात असे म्हटले आहे की, २०२२ मध्ये भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.१ टक्क्यांनी वाढ होईल. २०२१ मध्ये सरासरी पगारवाढ ८ टक्के होती.
nसर्वेक्षणानुसार, जवळपास सर्वच संस्था २०२२ मध्ये पगार वाढवण्याचा विचार करत आहेत, तर २०२१ मध्ये ९२ टक्के आणि २०२० मध्ये फक्त ६० टक्के कंपन्यांनी पगार वाढवला होता. २०२२ मध्ये
३४ टक्के संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकी वेतनवाढ देण्याची योजना आखत आहेत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये सरासरी पगारात दोन अंकी वाढ अपेक्षित आहे.
या अहवालासाठी अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील ७५० हून अधिक नियोक्ते/कार्यकारी यांचे मत विचारात घेतले आहे.