नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम जसजसा वेग घेत आहे, तसतसा भारतीय ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. रिसर्च फर्म रेडसीरच्या मते, या सणासुदीच्या हंगामात ४ लाख कोटी रुपयांची खरेदी अपेक्षित आहे. लोक ऑनलाइनऐवजी ऑफलाइन खरेदीला प्राधान्य देतील आणि बहुतेक जण स्थानिक स्टोअरमधून खरेदी करतील, असे अहवालात म्हटले आहे.
या खरेदीच्या हंगामात ऑफलाइनद्वारे ३.१० लाख कोटी रुपये जमा होतील, मागील वर्षी यातून २.५ लाख कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे दुकानदारांच्या वस्तू विक्रीत तब्बल २५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून ९०,००० कोटी रुपयांची ऑनलाइन खरेदी अपेक्षित आहे. सणासुदीचा हंगाम येण्यापूर्वीच ऑगस्टमध्ये किरकोळ विक्री ९ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक विक्री दागिन्यांची झाली आहे. डेलॉइटच्या सर्वेक्षणानुसार यावेळी लक्झरी आणि महागड्या उत्पादनांना अधिक मागणी असेल. सर्वेक्षणानुसार, ५६ % लोक लक्झरी उत्पादनांवर खर्च करण्यास तयार आहेत. १० लाख कारची विक्री यंदा अपेक्षित आहे.