Join us

यंदाच्या दिवाळीत सोन्या-चांदीची झाली बंपर खरेदी, हजारो कोटींची उलाढाल, आकडेवारी समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 9:15 PM

Gold: कोरोनामुळे दोन वर्षे आलेल्या सुस्तीनंतर यंदा दागदागिन्यांच्या बाजारात झटमगाट पाहायला मिळाला. कोरोनानंतर आलेल्या यावेळच्या धनत्रयोदशीला लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली

मुंबई - कोरोनामुळे दोन वर्षे आलेल्या सुस्तीनंतर यंदा दागदागिन्यांच्या बाजारात झटमगाट पाहायला मिळाला. कोरोनानंतर आलेल्या यावेळच्या धनत्रयोदशीला लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. आर्थिक अनिश्चितता असताना आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये मंदी येण्याची शक्यता असतानाही सोने आणि चांदीची विक्री गेल्या काही दिवसांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली. एआयजेजीएफने वर्तवलेल्या अंदाजानुसार धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. त्याशिवाय गोल्ड बारच्या विक्रीनेही यावेळी उच्चांक प्रस्थापित केले.

एआयजेजीएफच्या अंदाजानुसार दोन दिवसांच्या धनत्रयोदशीदरम्यान, देशामध्ये सोने-चांदीची नाणी, मूर्ती आणि भांड्याच्या विक्रीमधून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. शनिवार २२ ऑक्टोबर आणि रविवार २३ ऑक्टोबर यादरम्यान, देशभरातील बाजारांमध्ये गर्दी दिसून आली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या महासचिवांनी सांगितले की, कोविडच्या साथीमुळे बाजारामध्ये दोन वर्षे मंदी होती. त्यानंतर बाजारामध्ये ग्राहकांच्या गर्दीने व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. 

धनत्रयोदशीदिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. यावर्षी दिवाळीत कोरोनाचे कुठलेही निर्बंध नसल्याने बाजारांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. आता दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याची विक्री वाढेल, असी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.  

टॅग्स :सोनंदिवाळी 2022भारत