नवी दिल्ली - उद्योग व्यवसायात सुलभता आणण्याचा थेट नागरीकांच्या आयुष्याशी संबंध आहे. उद्योग व्यवसायातील सुलभतेमुळे लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावतो असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. ते शनिवारी इंडिया बिझनेस रिफॉर्म परिषदेत बोलत होते. जागतिक बँकेने नुकतीच उद्योग व्यवसायात सुलभता आणणा-या देशांची क्रमवारी प्रसिद्ध केली. या क्रमवारीत भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
भारताचे रँकिंग सुधारण्यामध्ये योगदान देणा-या सर्वांचे मोदींनी आभार मानले. भारत आता त्या स्थानावर पोहोचला आहे जिथून प्रवास अधिक सोपा बनला आहे. भारत आता ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारीत अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास करत आहे असे मोदी म्हणाले. केंद्र सरकार उद्योग-व्यवसायाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे असे मोदींनी सांगितले.
भारताच्या रँकिंगमध्ये झालेल्या सुधारणेवरुन सध्या जोरात राजकारण सुरु आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून याधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि काँग्रेसवर टीका केली. 142 व्या स्थानावरुन 100 व्या क्रमांकापर्यंत झालेल्या सुधारणेचा अर्थ काही लोकांना समजत नाही. हे तेच लोक आहे ज्यांनी वर्ल्ड बँकमध्ये काम केलंय असे मोदी म्हणाले. मी असा पंतप्रधान आहे ज्याने आतापर्यंत साधी वर्ल्ड बँकेची बिल्डींगही बघितलेली नाही. माझ्याआधी वर्ल्ड बँक चालवणारे लोक इथे बसायचे असे मोदी म्हणाले. वर्ल्ड बँकेमध्ये ज्यांनी काम केलेय ते सुद्धा रँकिंगमध्ये झालेल्या सुधारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मोदींनी नाव न घेता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला.