नवी दिल्ली :
‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेली दुबई अलीकडील काही वर्षांत भारतीय सेलिब्रिटींचे ‘बिझनेस हब’ बनताना दिसून येत आहे. मागील ३ वर्षांत शाहरुख खान, विवेक ओबेरॉय आणि सानिया मिर्झा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी बिझनेससाठी दुबईची वाट धरली आहे.
दुबईत भारतीय सेलिब्रिटी तेथे रियल एस्टेट, आभूषण, हॉटेल, स्पोर्टस् अकादमी आणि ॲक्टिंग स्कूल चालवित आहेत. दुबईत करात सवलत मिळते तसेच तेथील ९३ लाख लोकसंख्येत सुमारे ३८ टक्के भारतीय आहेत. ही दुबईच्या आकर्षणाची मुख्य कारणे आहेत.
शाहरुख खानचा ६६ अब्ज डाॅलर्सचा प्रकल्प
बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे दुबईत हाउसिंग व रियल इस्टेट व्यवसाय चालवित आहेत. त्यांची ६६ अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेल्या ‘रॉयल इस्टेट’ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये २३ लाख चौरस फूट क्षेत्रावर प्रकल्पाचे काम सुरू आहे.
विवेक ओबेराॅयचा रिअल इस्टेट प्रकल्प
विवेक ओबेराॅयने दुबईत ब्रिक्स अँड वुड नावाच्या कंपनीसोबत भागीदारीत ८ रिअल एस्टेट प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच नजिकच्या काळात लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीचे ५ शोरूम उघडण्याची विवेकची योजना आहे.
भारतीयांची गुंतवणूक
सन २०२२ ४.६७ लाख कोटी रुपये
सन २०२१ ३.६९ लाख कोटी रुपये
सन २०२३ ७.०० लाख कोटी रुपये
या सेलिब्रिटींचीही गुंतवणूक
अभिनेत्री प्रीति झंगियानी ही दुबईत ‘आर्म्स रेसलिंग’ची ‘प्रो पंजा लीग’ सुरू करीत आहे. राखी सावंतचे दुबईत ॲक्टिंग स्कूल आहे. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तही आपला व्यवसाय दुबई हलवित आहे.
आशा भोसले यांची येथे रेस्टॉरंट शृंखला आहे. सुष्मिता सेन हिचे दुबई मॉल व वाफी सिटी मॉलमध्ये ज्वेलरी शोरूम आहे. सानिया मिर्झा हिने दुबईत टेनिस अकादमी सुरू केली आहे. दुबईच्या अल मनखूल आणि जुमेराह लेक टाॅवर्समध्ये २ टेनिस केंद्रे तिने सुरू केली आहेत.