नवी दिल्लीः सरकारच्या विमा कंपन्या असलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी(National Insurance Company)लिमिटेड आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (United India Insurance) लिमिटेडचं ओरिएंटल इन्शुरन्स (Oriental Insurance)मध्ये विलीनीकरण होणार आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या तीन कंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.अर्थसंकल्पाच्या आधी किंवा नंतर कधीही या कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा होऊ शकते. कोलकातात या तिन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या बोर्डाची बैठक झाली. याच बैठकीत या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या बोर्डाकडून मंजुरी मिळण्यापूर्वीच ओरिएंटल आणि युनायटेड इंडियानं विलीनीकरणाला मंजुरी दिलेली आहे. या विलीनीकरणात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसुद्धा सहभागी होऊ शकते. 4 जनरल कंपन्यांचं विलीनीकरण करून तयार होणार एक कंपनी ? सरकारचं चार सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्यांचं विलीनीकरणाचं विचाराधीन आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीलासुद्धा त्या विलीनीकरणात सहभाग करण्याचा सरकारचा मानस आहे. असं केल्यानंतर एकच मोठी कंपनी नावारूपाला येणार आहे. सरकारला या विमा कंपन्यांचं विलीनीकरण करून बळकट करायचं आहे. वित्त वर्ष 2018-19च्या सामान्य अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींनी या विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती.परंतु या कंपन्यांची वित्तीय स्थिती खराब असल्यानं तेव्हा विलीनीकरण झालं नाही. आर्थिक वर्ष 2020-21चं सामान्य बजेट फेब्रुवारी 2020ला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पादरम्यान वित्त मंत्री निर्मला सीतारामण सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांना निधी देण्याची घोषणा करू शकतात. सरकारनं गेल्या महिन्यात 2019-20ला अनुदानाच्या स्वरूपात नॅशनल इन्शुरन्स कंपनी(National Insurance Company)लिमिटेड आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (United India Insurance) लिमिटेड अन् ओरिएंटल इन्शुरन्स (Oriental Insurance) कंपनीला 2500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
'या' तीन सरकारी विमा कंपन्यांचं लवकरच होणार विलीनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 1:21 PM