रुपयाची घसरण, चीनच्या उत्पादन क्षेत्रामध्ये झालेली घट, जागतिक मंदी येण्याची व्यक्त होत असलेली भीती, घसरत चाललेला रुपया आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली विक्री अशा वातावरणात मुंबई शेअर बाजार मंदीत राहिला. सप्ताहभरात निर्देशांक ७०० अंशांनी खाली आला. यामुळे बाजार सुमारे तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.मुंबई शेअर बाजारात बुधवारचा अपवाद वगळता सर्वच दिवशी विक्रीचा मोठा जोर असल्याने संवेदनशील निर्देशांक खाली येताना दिसून आला. सप्ताहभरात संवेदनशील निर्देशांक ७०१.२४ अंशांनी म्हणजेच सुमारे तीन टक्क्यांनी खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २७३६६.०७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही (निफ्टी) घसरण झाली. हा निर्देशांक सुमारे अडीच टक्के कमी होऊन २१८.६० अंश खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस ८२९९.९५ अंशांवर हा निर्देशांक बंद झाला. फार्मा आणि एफएमसीजी या क्षेत्रातील आस्थापनांच्या समभागांना काही प्रमाणात मागणी असल्यामुळे या दोन क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. बाकी बाजारामध्ये मंदीचेच वातावरण राहिले. चीनमधील उत्पादन घटल्याची आकडेवारी मागील सप्ताहात जाहीर झाली. चीनमधील हा बदल जगभरात चिंता निर्माण करणारा ठरला. जगात मंदी येण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आणि सर्वांनीच सावधगिरीचा पवित्रा घेतला. विविध परस्पर निधी आणि वित्तीय संस्थांनी आपली परिस्थिती मजबूत करण्यासाठी विक्रीचा पवित्रा घेतल्याने जगभरातील जवळपास सर्वच शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण असल्याचे दिसून आले.
सातशे अंकांच्या गटांगळीनंतर गाठला तीन महिन्यांचा तळ
By admin | Published: August 23, 2015 10:38 PM