कोल्हापूर : जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी देशभरातील तमाम व्यापारी उद्योगजगताकडून सातत्याने होत होती. 31 ऑगस्ट 2019 अखेर असलेली ही मुदत तीन महिन्याने वाढवून ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी रात्री दिली.
राष्ट्रीय स्तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर या प्रणालीमध्ये गेल्या दोन वर्षात विविध सुधारणा करण्यात आल्या. या नवीन सुधारणा सह रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती, परंतु या नवीन असलेल्या करप्रणाली अनुसार हे रिटर्न भरणे व्यापारी उद्योजक,कर सल्लागार यासाठीसुद्धा जिकिरीचे होते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेषतः महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती मुळे व्यापारी उद्योजकांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये दिलेल्या मुदतीत जीएसटीचे विवरणपत्र भरणे अत्यंत अवघड बनले होते. व्यापारी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून ही मुदतवाढ देण्याचे आश्वासन पूर्ण केले असून आज यासंबंधीचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने त्यांचे 26 ऑगस्ट 2019 चे आदेश क्रमांक 7/ 2019 अन्वये हा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयाचे देशभरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व कर सल्लागार स्वागत करीत असल्याची माहिती चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.