मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायझेस या सुभाष चंद्रा यांच्या समूहाला कर्ज देणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांनी स्वत:चे भाग भांडवल विकून कर्जफेड करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे, अशी माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली.
झी व त्यांची सहयोगी एस्सेल इन्फ्रास्ट्रक्चर व एस्सेल प्री पॅक व डिश टीव्ही या कंपन्यांवर सध्या १७००० ते १८००० कोटी कर्ज थकित आहे. झी उद्योग समूहाला ५००० कोटी तोटा झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. परिणामी गेल्या आठवड्यात समूहाच्या कंपन्यांचे समभाग ३० ते ३५ टक्क्याने गडगडले व गुंतवणूकदारांना १४,००० कोटी नुकसान सहन करावे लागले. शुक्रवारी झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी यासाठी भागधारकांची माफी मागितली होती व काही हितशत्रू झी समूहाची प्रगती रोखत असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर शनिवारी व रविवारी कर्जदार बँका व झी समूहाचे प्रवर्तक यांच्यात अनेक बैठका झाल्या व त्यात ही मुदत देण्याचे मान्य झाले असे सूत्रांनी सांगितले. झी समूहामध्ये सुभाष चंद्रा व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळपास ४२ टक्के भाग भांडवल गुंतविले आहे. ते विकून कर्जाची परतफेड करण्यासाठी ही मुदत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुलाशानंतर समभाग पुन्हा उसळले
शुक्रवारी मोठ्या घसरगुंडीनंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसचे समभाग सोमवारी १७ टक्क्यांनी उसळले. नोटांबदीच्या काळात हेराफेरी केल्याच्या आरोपावरून नित्यांक इन्फ्रापॉवर अँड मल्टी व्हेंचर या कंपनीची चौकशी सुरू झाल्यामुळे झी समूहातील कंपन्यांचे समभाग ३३ टक्क्यांनी आपटले होते. ही कंपनी ‘झी’च्या मालकीची असल्याची चर्चा होती. ‘नित्यांक’ कंपनीचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा ‘झी’कडून करण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग पुन्हा वर चढले.
झी समूहाला कर्ज फेडण्यासाठी भांडवल विकण्यास तीन महिने मुदत
विविध कंपन्यांनी बँका व वित्तीय संस्थांचे १८००० कोटी थकविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:04 AM2019-01-29T06:04:35+5:302019-01-29T06:04:48+5:30