नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटांचे सुमारे तीन हजार कोटी रुपये प्रवाशांना हवाई वाहतूक कंपन्यांकडून परत केले जाण्याची शक्यता नाही. पैसे परत करण्याऐवजी कंपन्यांनी प्रवाशांना ‘ट्रॅव्हल क्रेडिट’ दिले आहे. त्यानुसार या तिकिटावर प्रवासी भविष्यात प्रवास करू शकतील.
एका वृत्तानुसार, हवाई वाहतूक कंपन्यांनी १,५०० कोटी रुपये प्रवाशांना परत केले आहेत, तर तीन हजार कोटी रुपयांचे ट्रॅव्हल क्रेडिट दिले आहे. हवाई वाहतूक कंपन्या आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीदरम्यान ही आकडेवारी समोर आली आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हवाई वाहतूक कंपन्या वाईट स्थितीतून जात आहेत. अशा प्रसंगी त्यांच्यावर पैसे परत करण्याची सक्ती करणे योग्य होणार नाही. यात प्रवासी आणि कंपन्या या दोघांचीही काळजी घेतली जाईल, असा तोडगा काढणे आवश्यक आहे.
कंपन्या संकटात
हवाई वाहतूक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका विमान वाहतूक कंपन्यांना बसला आहे. कंपन्या आर्थिक संकटात आहेत. अशाप्रसंगी अनेक प्रवाशांचे पैसे परत करणे कंपन्यांना शक्य नाही.