फ्रान्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्रतिक्रिया जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीने उमटली; मात्र सप्ताहाच्या उत्तरार्धात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे भारतीय बाजारात तेजी परतू लागल्याची चिन्हे आहेत. तीन सप्ताहांच्या घसरणीनंतर निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढून बंद झाला आहे. विशेष म्हणजे परकीय वित्तसंस्थांनी विक्री करूनही बाजारामध्ये झालेली वाढ आशादायक आहे.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस २५८६८.४९ अंशांवर बंद झाला. सप्ताहभरात या निर्देशांकात १.१ टक्के म्हणजे २५७.९६ अंशांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९४.३० अंशांनी म्हणजेच १.२१ टक्क्यांनी वधारून ७८५६.५५ अंशांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.९२ आणि २.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आधी सलग तीन आठवडे बाजार खाली येऊन निर्देशांकामध्ये सुमारे सात टक्क्यांची घट झाली आहे.फ्रान्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सप्ताहाची सुरुवातच दहशतवादाच्या भीतीमध्ये झाली. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र चांगला राहिला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होऊन त्यामध्ये डिसेंबर महिन्यात व्याजदरांमध्ये अल्प वाढ होण्याची शक्यता जाहीर करण्यात आली. यामुळे जगभरातील बाजारांमध्ये काही प्रमाणात तेजी आली; मात्र अमेरिकेतील आर्थिक सुधारणांचा वेग हा कमी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा जोर कायम ठेवला. या संस्थांनी ३२०७ कोटी रुपयांची विक्री केली. या विक्रीनंतरही भारतीय बाजारामध्ये तेजी दिसून आली ती झोटे गुंतवणुकदार आणि देशी वित्तसंस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे. बाजाराचे नियंत्रण परकीय वित्तसंस्थाकरीत असल्याचा रूढ होत चाललेला समज यामुळे खोटाठरला.आॅक्टोबर महिन्यामध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये घट झाली आहे. या जोडीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्येही वाढ झालेली दिसून आली. सप्ताहभरात ०.०७ टक्के एवढे हे मूल्य वाढले आहे.सप्ताहामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल. याशिवाय निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन सरकारी खजिन्यातील तूट भरून काढण्याचा प्रयत्नही सुरू झालेला दिसून येत आहे.
तीन सप्ताहांनंतर उमटू लागली पुन्हा तेजीची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2015 11:44 PM