नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ज्यावर अर्थव्यवस्था चालते त्या चार चाकांपैकी तीन चाके पंक्चर झाली आहेत, अशी टीका माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे केली. एका पत्रकार परिषदेत बोलताना चिदंबरम म्हणाले की, ‘जीएसटी’च्या चुकीच्या अंमलबजावणीच्या दुष्परिणामांतून व्यापार व उद्योग क्षेत्र अजूनही सावरलेले नाही आणि नोटाबंदीने झालेले नुकसानही निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
समाजाचे अनेक वर्ग मेटाकुटीला आले आहेत, असा आरोप करून ते म्हणाले की, कृषी उत्पादनास रास्त दर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग संकटात आहे तर रोजगार नसल्याने तरुण पिढी त्रस्त आहे. देशात बेरोजगारी वारेमाप वाढत आहे.
शिक्षण पूर्ण करून कॉलेजांतून बाहेर पडल्यावरही नोकरी-रोजगार मिळणार नाही हे दिसत असल्याने विद्यार्थीवर्गाच्या मनात असंतोषाची भावना आहे, असाही आरोप चिदंबरम यांनी केला.
चार चाकांचा गाडा असा खिळखिळा होत गेला
पहिले चाक निर्यातीचे. गेल्या चार वर्षांत निर्यात वाढण्याऐवजी कमी होत गेली आहे.
दुसरे चाक खासगी गुंतवणुकीचे. ही गुंतवणूक पूर्णपणे थांबली नसली तरी ती डामाडौल झाली आहे. गेल्या तीन वर्षांत सकल स्थायी भांडवल उभारणी २८.५ टक्क्यांच्या पुढे जाऊ शकलेली नाही.
तिसरे चाक ग्राहकोपयोगी मालाच्या मागणीचे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत लडखडत असलेली ही मागणी आता जरा कुठे पुन्हा स्थिरावताना दिसत आहे. पण हे किती दिवस राहील याची शाश्वती नाही.
फक्त एकच चाक पंक्चर न होता शाबूत आहे व ते म्हणजे सरकारी खर्चाचे. पण चालू खात्यातील तूट व वित्तीय तूट वाढत असल्याने याबाबतीतही सरकारला फारसे पर्याय उरलेले नाहीत.
अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर; चिदंबरम यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ज्यावर अर्थव्यवस्था चालते त्या चार चाकांपैकी तीन चाके पंक्चर झाली आहेत, अशी टीका माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:38 AM2018-06-12T01:38:32+5:302018-06-12T01:38:32+5:30