नवी दिल्ली : डाळींचा पुरवठा कायम राहावा आणि त्याच्या वाढत्या किमती आवरण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी डाळी महाग होत आहेत. किरकोळ बाजारात तुरीची डाळ २०० रुपये किलोवर गेली आहे. गेल्या आठवड्यात ती १८५ रुपये होती.डाळींच्या देशांतर्गत उत्पादनात घट झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे भाव वाढत होते. कमी पाऊस आणि अवकाळी पावसामुळे २०१४-२०१५ या पीक वर्षात (जुलै ते जून) डाळींचे उत्पादन एकदम २० लाख टनांनी कमी होऊन १.७२ कोटी टन झाले.ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तुरीची डाळ आज बाजारात २०० रुपये किलो असून गेल्या वर्षी याच महिन्यात ती ८५ रुपये होती. गेल्या पाच वर्षांत किरकोळ बाजारात तुरीची डाळ ७४ ते ८५ रुपये किलो होती. उडीद डाळीचा भाव एक आठवड्यात कमी झाला असून गेल्या आठवड्यात १८७ रुपये किलोची डाळ आज १७० रुपयांवर आली. गेल्या वर्षीच्या तुलनेतही हा भाव दुप्पट आहे.गेल्या वर्षी याच महिन्यात उडीद डाळ ९८ रुपये किलो होती. देशांतील बाजारात डाळींचा पुरवठा कायम राहावा आणि साठेबाजांना धाक बसण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले असले तरी डाळींच्या किमती वाढतच आहेत. किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना एमएमटीसीकडून अनुदानित डाळ घेऊन तिचा पुरवठा करण्यास सांगितले आहे.पाच हजार टन डाळींची आयातडाळींची साठेबाजी होऊ नये यासाठी सरकारने रविवारी बिग बाजारसारखी मोठी दुकाने, परवानाधारक अन्न प्रक्रिया करणारे, आयातदार व निर्यातदारांवर डाळींच्या साठ्याची मर्यादा घालून दिली आहे. व्यापाऱ्यांकडे डाळींचा किती साठा असावा याची मर्यादा आधीपासूनच लागू आहे. याशिवाय एमएमटीसीने पाच हजार टन तुरीची डाळ आयात केली असून आणखी दोन हजार टन डाळीच्या आयातीसाठी नव्याने निविदा जारी केली आहे.पुरवठा खंडित होऊ नये म्हणून कंपनी विदेशातूनही डाळ विकत घेण्यासाठी निविदा देण्यावर विचार केला आहे.
तूरडाळीचा भाव नियंत्रणाबाहेरच
By admin | Published: October 20, 2015 3:49 AM