नवी दिल्ली : स्वस्तात विमानसेवा देणारी कंपनी ‘गाे फर्स्ट’च्या दिवाळखाेरीच्या अर्जावर राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाने कंपनीच्या निर्णय राखून ठेवला आहे. कंपनीची ९ मेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून १५ मेपर्यंत काेणतेही बुकिंग करण्यासही राेखण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप हाेत असून पर्यटनालाही याचा फटका बसणार आहे.
कंपनीच्या याचिकेची दिवसभर सुनावणी झाली. त्यानंतर लवादाने निर्णय राखून ठेवला. भाडेपट्ट्यावर विमाने पुरवणाऱ्या कंपन्यांनी या याचिकेस विरोध केला आहे. आपले म्हणणे ऐकल्याशिवाय समाधान प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
उड्डाणे रद्द झाल्यानंतर प्रवाशांचा एकच गाेंधळ उडाला आहे. विविध विमानातळांवर गाे फर्स्टच्या काऊंटरवर प्रवाशांनी गर्दी केली हाेती.
दाेन ते चार पट तिकीट महाग
उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना एकतर घरी परतणे वा दुसऱ्या कंपनीचे तिकीट बुक करण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या विमानाचे तिकीट बुक करायचे असल्यास २ ते ४ पट अधिक भाडे आकारण्यात येत आहे. गाे फर्स्टला मागणी हाेती, अशा मार्गांवर प्रवास भाडे जास्त वाढले आहे.
बंद पडलेल्या विमान कंपन्या
गेल्या काही दशकांमध्ये पुढील प्रमुख विमान कंपन्या बंद पडल्या. एअर सहारा, जेट एअरवेज, किंगफिशर एअरलाईन्स, पॅरामाउंट एअरवेज, वायुदूत एअरलाईन्स, एअर पेगासस, एअर मंत्रा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, माेदीलुफ्त, कलिंगा एअरलाईन्स
बच्चे कंपनी नाराज
बच्चे कंपनीच्या सुट्ट्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रवाशांसमाेर दाेनच पर्याय शिल्लक आहेत. प्रवास रद्द करून घरी परतणे किंवा दुसऱ्या कंपनीचे महाग तिकीट विकत घेऊन प्रवासाला जाणे. अशा वेळी सर्वसामान्यांनाच आर्थिक भुर्दंड बसला आहे.
पर्यटनाला बसणार फटका
दिल्ली-श्रीनगर आणि मुंबई-गाेवा या दाेन मार्गांवर गाे फर्स्टला प्रचंड मागणी हाेती. सुट्टीसाठी लाेकांची पसंती या ठिकाणांना असते. याशिवाय मुंबई-श्रीनगर, चेन्नई-पाेर्ट ब्लेअर या मार्गांवरील प्रवासभाडे वाढले आहे. यामुळे पर्यटनाला फटका बसू शकताे.