लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रद्द झालेल्या उड्डाणांची तिकिटे विकून हवाई प्रवाशांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या खटल्यात ऑस्ट्रेलियाची हवाई वाहतूक कंपनी ‘क्वांटास एअरवेज’ने तडजोड केली असून ७.९ कोटी अमेरिकी डॉलर दंडाच्या स्वरूपात देण्याची तयारी दर्शविली आहे. हे प्रकरण २०२१-२२ मधील आहे. यातील ६.६ कोटी डॉलरची रक्कम दंडाच्या स्वरूपात असेल, तसेच १.३ दशलक्ष डॉलर ८६ हजार प्रवाशांना भरपाई म्हणून
दिले जातील.
ऑस्ट्रेलियाई प्रतिस्पर्धा आणि ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष जीना कॅस-गॉटलिब यांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले की, ‘क्वांटासचे आचरण अहंकारी आणि अस्वीकार्ह होते. अनेक प्रवाशांनी सुटी, व्यापार अथवा पर्यटनाच्या हेतूने विमानाची तिकिटे बुक केली असतील. त्यांची मोठी फसवणूक झाली आहे.
अनेकांचे आर्थिक नुकसान झाले असेल. ऑस्ट्रेलियात काम करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांसोबत सदैव स्पष्ट आणि प्रामाणिक असले पाहिजे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे.’
कंपनीचे म्हणणे काय?
क्वांटास समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वेनेसा हडसन यांनी सांगितले की, तडजोड न्यायालयाच्या मंजुरीच्या अधीन आहे. आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. काेविड साथीनंतर आम्ही पुन्हा उड्डाण सुरू केले तेव्हा, ग्राहकांना निराश केले, हे आम्हाला मान्य आहे.