शॉर्ट व्हिडीओ अॅप Tiktok ने भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. २०२० मध्ये चिनी सैनिकांनी भारताच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी देखील चिनी सैन्याची वाताहत केली होती. यानंतर मोदीसरकारने चिनी अॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक हे प्रसिद्ध अॅपदेखील होते. तेव्हापासून या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार होती.
भारताने अद्याप काही या अॅपवरील बंदी उठविलेली नाहीय. चिनी कंपनी बाईटडान्सने कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांपर्यंत नोटीस पिरीएड म्हणून पगार दिला जाईल असे कर्मचाऱ्यांना सांगितले होते. काही कर्मचारी असे देखील होते, ज्यांना तीन महिन्याचाच नोटीस पिरिएड देण्यात आला होता.
टिकटॉकशी संबंधित सूत्रांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, कर्मचाऱ्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला एका कॉलद्वारे कामावरून कमी करत असल्याचे कळविले गेले. यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांचा पगारही देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
टिक टॉक इंडियाच्या कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असल्याची माहिती देण्यात आली होती. भारतातील व्यवसाय बंद केला जाऊ शकतो, असेही कर्मचाऱ्यांना काही काळापूर्वी सांगण्यात आले होते. भारतातील बहुतांश कर्मचारी दुबई आणि ब्राझीलच्या बाजारपेठेत काम करत होते. भारतात टिकटॉकचे २० कोटी युजर होते.