Join us

15 जूनपर्यंत तब्बल 1 लाख कोटींचा आयकर जमा, 26 टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 8:34 AM

मुंबईत करदात्यांनी सर्वात चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 138 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - 15 जूनपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आयकर विभागाकडे एकूण 1 लाख 1 हजार 24 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षींच्या तुलनेत करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी 15 जूनपर्यंत जमा झालेल्या आयकराची रक्कम 80 हजार 75 कोटी इतकी होती. मेट्रो शहरांमध्ये मुंबईने सर्वात जास्त महसूल गोळा केला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंतची आहे.
 
मुंबईत करदात्यांनी सर्वात चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 138 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत एकूण 22 हजार 884 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षी हा आकडा फक्त नऊ हजार 614 कोटी इतकाच होता. दोन्ही वर्षांतील आकडेवारीची तुलना करता ही वाढ तब्बल 138 टक्क्यांची आहे. 
 
देशभरातून जमा होणा-या आयकरात एक तृतीयांश वाटा मुंबईचा असतो.  मुंबईनंतर देशात दुस-या क्रमांकावर असणा-या नवी दिल्लीने एकूण 38 टक्क्यांची वाढ दाखवली असून 11 हजार 582 कोटी आयकर जमा केला आहे. गतवर्षी हा आकडा आठ हजार 334 कोटी इतका होता. 
 
कोलकातानेही प्रगती दाखवली असून सात टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी तीन हजार 815 कोटींचा आयकर जमा झाला होता, तुलनेत यावर्षी चार हजार 84 कोटी जमा झाले आहेत. बंगळुरुत गतवर्षी 13 हजार 973 कोटी जमा झाले होते. यावर्षी एकूण 14 हजार 923 कोटी जमा झाले आहेत. 6.8 टक्क्यांची वाढ बंगळुरुत पाहायला मिळाली आहे
 
चेन्नईत मात्र आकडेवारी घसरली असल्याचं दिसत आहे. गतवर्षी जिथे आठ हजार 986 कोटी जमा झाले होते, तिथे हा आकडा घसरुन आठ हजार 591 कोटींवर पोहोचला आहे. 
 
पुणे शहरात 19 टक्क्यांची वाढ होत सहा हजार 163 कोटी रक्कम जमा झाली आहे. तर ठाण्यात 11 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.